फांदी तोडण्याऐवजी पूजन करा रोपाचे!

फांदी तोडण्याऐवजी पूजन करा रोपाचे!

औरंगाबाद -  वटपौर्णिमेला महिलांना पूजा करता यावी, यासाठी अनेक भागांत वडाची फांदी तोडून आणली जाते. तसे न करता रोपटे आणून जवळच्या बगीचात, मैदानात लावावे किंवा कुंडीतल्या रोपाचे पूजन करावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.

जन्मोजन्मी हाच पती मिळो, अशी कामना मनी बाळगून स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वडाच्या झाडाला दोऱ्याचे वेष्टन देऊन, दिवसभर उपवास करून सती सावित्रीचे व्रत मोठ्या भक्तिभावाने करतात. वडाचे झाड जवळ नसल्यास कुठूनतरी पूजेपुरती फांदी तोडून आणली जाते. पूजा झाल्यानंतर मात्र दुसऱ्या दिवशी फेकून दिली जाते.

वडाचे झाड जमिनीची धूप कमी करते. पक्ष्यांना सुरक्षित आसरा देते. औषधी किंवा आहारामध्ये महत्त्व असलेल्या झाडे, वेली, फुलांची पूजा करणे हा कृतज्ञता भाव धर्मातील परंपरांमध्ये आला असावा. मात्र, याच सजीव झाडांच्या फांद्या, पाने तोडण्याची आपली संस्कृती नाही. वटपौर्णिमेसारखे वृक्षपूजेचे महत्त्व सांगणारे सण कालबाह्य ठरू नयेत, यासाठी शहरात अनेक महिला मंडळे वडाची रोपे जगविण्यासाठी पुढाकार घेत आहेत. महाराष्ट्रात या सणाच्या वेळी मॉन्सूनचे आगमन होत असते. त्यामुळे या सणाला आधुनिकतेची जोड म्हणून वृक्षसंवर्धनाच्या जाणिवेचा सण म्हणून बघितल्यास पर्यावरणाला मोठाच हातभार लागेल.

शहरात अगोदरच दुर्मिळ झालेल्या वडाच्या फांद्या तोडण्यापेक्षा नर्सरीतून रोपटे आणून किंवा बाजारात मिळणारा पूजेचा सचित्र कागद आणून पूजा करावी. पूजेसाठी तोडून आणलेली फांदी कुंडीत लावून ठेवल्यास त्यापासूनही झाड लागते. दरवर्षी तेच पूजेलाही वापरता येते, असे अनेक पर्याय तज्ज्ञांनी सुचविले आहेत. 

कश्‍यप ऋषींचा बोधी वृक्ष 
हिंदू, बौद्ध आणि जैन धर्मांमध्ये वड, पिंपळ आणि औदुंबर वृक्षांना विशेष महत्त्व आहे. वटवृक्ष हा अनेक बोधी वृक्षांपैकी एक आहे. जसे- पिंपळाचे झाड शाक्‍यमुनींचा बोधी वृक्ष आहे, तसाच वड हा कश्‍यप ऋषींचा बोधी वृक्ष आहे. औदुंबर हे कनकमुनींचे, तर साल हे विश्‍वंभूचे बोधी वृक्ष आहेत. वड हे शिवाचे, यमाचे प्रतीक मानले जाते. मघा नक्षत्राचा आराध्य वृक्ष आणि मीन राशीचा वृक्ष म्हणून वडाचे ज्योतिषशास्त्रामध्येही महत्त्वाचे स्थान आहे.

व्रताची कथा
पुराणकथेनुसार यमधर्माने सत्यवानाचे प्राण हरण केल्यावर सावित्रीने त्याच्याशी तीन दिवस शास्त्रचर्चा केली. त्यावर प्रसन्न होऊन यमाने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. ही चर्चा वटवृक्षाच्या झाडाखाली झाली; म्हणून वटवृक्षाशी सावित्रीचे नाव जोडले गेले. सावित्रीप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्य वाढावे, म्हणून स्त्रियांनी या व्रताची सुरवात केली.

दुपारनंतर पूजन मुहूर्त
यंदा गुरुवारी (ता. आठ) दुपारी चार वाजून सोळा मिनिटांनी पौर्णिमा आरंभ होणार असल्यामुळे त्यानंतर वटवृक्षाचे पूजन करून वाण द्यावे, असे अनंत पांडव गुरुजी यांनी सांगितले. धर्मसिंधू ग्रंथात सांगितल्याप्रमाणे, पौर्णिमेच्या दिवशी १८ घटी युक्त चतुर्दशी पौर्णिमेस स्पर्श करीत असेल, तर त्याच दिवशी वटसावित्री व्रत करावे, असे श्री. पांडव म्हणाले.

अनेकजण पूजेसाठी आमच्याकडून रोपे नेतात; पण त्याचे प्रमाण तुलनेने कमीच आहे. यंदा पैठण रस्त्यावरील वडाची महाकाय झाडे तोडली गेली. कित्येक महिला त्याच्या फांद्या पूजेसाठी नेताना दिसल्या. पूजेच्या निमित्ताने का होईना, वड, पिंपळ, उंबर यांसारख्या वृक्षांचा सहवास लाभावा. त्या ठिकाणची सृष्टी, पशू-पक्षी न्याहाळावेत, असा या सणामागचा उद्देश होता. आता वृक्षांचा सहवास फांदीपुरता राहिला. मूळ उद्देश बाजूला पडून अवास्तव गोष्टींना महत्त्व आले. 
- सुहास वैद्य, पल्लवांकुर नर्सरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com