शहरात दोन दिवस पाण्याचे वांधे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - फारोळा येथील महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे विजेच्या तारा तुटून चार तास वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही पाणीपुरवठा योजना बंद पडल्या. त्यामुळे दुपारनंतर अनेक वसाहतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सुमारे साडेचार तास पाणीपुरवठा बंद असल्याने आगामी दोन दिवस शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

फारोळा येथील जलशुद्धीकरण केंद्राला पैठण येथील २२० केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा करण्यात येतो. मंगळवारी (ता. एक) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास वीजपुरवठ्याच्या फोर पोल स्ट्रक्‍चरवर अचानक स्पार्किंग झाली. यात इन्सुलेटर व विजेच्या तारा तुटल्याने वीज गूल झाली. त्यामुळे जायकवाडी ते शहरापर्यंत पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या १०० दशलक्ष लिटर व ५६ दशलक्ष लिटर क्षमतेच्या दोन्ही योजना बंद पडल्या. 

दुपारी अडीच ते सायंकाळी साडेपाचपर्यंत या दोन्ही योजना बंद होत्या. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा सुमारे साडेचार तास खंडित झाला. म्हणून मंगळवारी दुपारनंतर पाणीपुरवठ्याचा टप्पा असलेल्या वसाहतींना पाणीपुरवठा होऊ शकला नाही. तसेच बुधवारी होणाऱ्या पाणीपुरवठ्याचा टप्पा असणाऱ्या वसाहतींनाही पाणीपुरवठा होणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहेल यांनी सांगितले. 

या भागात आज निर्जळी
बुधवारी (ता. दोन) भुजबळनगर, पडेगाव, कोतवालपुरा, खडकेश्‍वर, सम्राट कॉलनी, भोईवाडा हनुमान टेकडी जलकुंभावरील वितरण, पैठण गेट, टिळकपथ, सिल्लेखाना, जुना उस्मानपुरा, रमानगर, नूतन कॉलनी, गुलमंडी, औरंगपुरा, मछलीखडक, म्हाडा, चिकलठाणा, जयभवानीनगर, रामनगर, गाडगेनगर, नागसेननगर, कबीरनगर या भागात पाणी येणार नाही, किंवा कमी दाबाने येण्याची शक्‍यता आहे. तसेच सिडको, एन-पाच व एन-सात जलकुंभावरून होणाऱ्या पाण्याच्या वेळेतही कपात करण्यात आली आहे.

Web Title: aurangabad news water