औरंगाबाद जवळील चित्ते नदी खोऱ्यात जलसमृद्धी

राजेभाऊ मोगल
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017

या नदी पुनरुज्जीवनाच्या कामामुळे आमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले आहेत. पाण्याअभावी आमच्या बागा सुकायच्या. मात्र, आता जल समृद्धीमुळे बहरल्या आहेत. उत्पादनातून चांगले पैसे हाती येत असल्याने जीवनमानच बदलले आहे. पाण्याची किंमत काय असते, याची जाणीवही या माध्यमातून झाली. असे प्रकल्प अन्य ठिकाणी देखील राबविण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. 
- अर्जुन मदगे, शेतकरी, पाचोड. 

औरंगाबाद : काळाची गरज ओळखून पिण्याच्या पाण्यासोबतच शेतकऱ्यांच्या बागा जगल्या पाहीजेत, यासाठी 'सकाळ रिलिफ फंड' च्या सहकार्याने राबविण्यात आलेल्या चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानाचे फळ आता दिसू लागले आहे. नदी खोऱ्यात जलसमृद्धी आली असून भुजल पातळीत 3 मिटरने वाढ तर संरक्षीत सिंचन क्षेत्रात दोन हजार सहाशे एकरने वाढ झाली आहे. तसेच दुध उत्पादनात 12 हजार लिटर, साडेतीनशे एकर क्षेत्रात भाजीपाला उत्पादीत केला जात असून अनेकाच्या हाताला काम उपलब्ध आहे. 

'सकाळ माध्यम समूह' व ग्रामविकास संस्थेच्या पुढाकाराने लोकसहभागातून राज्यातील पथदर्शी चित्ते नदी अभियान राबविण्यात आले. आजतागायत समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे चित्तेनदी कधीच माथा ते पायथा भरून वाहीली नव्हती. याठिकाणी नैसर्गिक अनुकुलता असूनही जलव्यवस्थापनाचा व संघटीतपणाचा अभाव असल्यामुळे सतत दुष्काळ पडत असे. मात्र, आता चित्ते नदी पुनरुज्जीवनामुळे माथा ते पायथा 17 किलो मिटर दुथडी भरुन वाहीली. यामुळे परिसरातील 521 विहीरी पाण्याने तुडूंब भरलेल्या आहेत. चित्ते नदी खोऱ्यातील सर्व गावे दुष्काळमुक्‍त झालेली आहेत. 

वसुंधरा प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानातर्गंत आजतागायत चित्ते नदी खोऱ्यात 3 हजार हेक्‍टर कंपार्टमेंट बंडीग 198 हेक्‍टर डीप सीसीटी या नदीवर साखळी पद्धतीने 21 सिमेंट बंधारे, 21 शेततळे, 17 पैकी 12 किलो मिटरचे रुंदीकरण व खोलीकरण आणि 29 पैकी 12 पाझर तलावातील 70 हजार घन मिटर गाळ काढण्यात आला. जवळपास दीड कोटी रुपयांची कामे ही लोकसहभागातून करण्यात आलेली आहेत. याचबरोबर चित्ते नदी खोऱ्याच्या सर्वागिण विकासासाठी कॉंक्रीट रोड, सार्वजनिक सभागृह, सोलर लॅम्प, जनरेटर, क्रिडा साहित्य, क्षमता बांधणी प्रशिक्षण, महिला बचत गट, सेंद्रीय शेती, आधुनिक पद्धतीने भाजीपाला लागवड हे उपक्रम राबविण्यात आले आहेत. 

या कामांमुळे चित्ते नदी खोऱ्यात सकारात्मक बदल झाले आहेत. याठिकाणी आजपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मंत्री पंकजा मुंढे, इस्त्राईलचे राजदूत डेव्हीड अकाव अशा अनेक मान्यवरांनी येथे भेट देऊन या कामांची पाहणी केली. 

ग्रामविकास संस्थेच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या चित्ते नदी पुनरुज्जीवन अभियानास सकाळ रिलीफ फंड, वसुंधरा, जलयुक्‍त शिवाय अभियान, कृषी विभाग, केअरींग फ्रेडस मुंबई, मराठवाडा युवक विकास मंडळ यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे ग्रामविकास संस्थेचे नरहरी शिवपुरे या ठिकाणी भेट देणाऱ्यांना सांगत आहेत.

लोकसहभागातून राबविण्यात आलेला दुष्काळ निवारणाचा हा पथदर्शी प्रकल्प आहे. चित्ते नदी दुथडी भरून वाहिल्यामुळे परिसरातील वाड्या, वस्त्यासह 27 गावे दुष्काळमुक्‍त झाली. औरंगाबाद शहराला दर्जेदार दुध, फळे, भाजीपाला, धान्य पुरविण्याचे मोलाचे काम चित्ते नदी खोऱ्यातून होत आहे. यापुढे कृषी पर्यटन व कृषी पुरक व्यवसायाला चालना देण्यात येणार असून या नदी खोऱ्याचा सर्वांगिण विकास साधला जाईल. 
- नरहरी शिवपुरे, ग्रामविकास संस्था, औरंगाबाद. 

या नदी पुनरुज्जीवनाच्या कामामुळे आमच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आले आहेत. पाण्याअभावी आमच्या बागा सुकायच्या. मात्र, आता जल समृद्धीमुळे बहरल्या आहेत. उत्पादनातून चांगले पैसे हाती येत असल्याने जीवनमानच बदलले आहे. पाण्याची किंमत काय असते, याची जाणीवही या माध्यमातून झाली. असे प्रकल्प अन्य ठिकाणी देखील राबविण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यायला हवा. 
- अर्जुन मदगे, शेतकरी, पाचोड.