कोरडवाहू पिकांनी टाकल्या माना, दुबार पेरणी

कोरडवाहू पिकांनी टाकल्या माना, दुबार पेरणी

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास वीस दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके धोक्‍यात आली आहेत. जूनच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी, मका लागवडीसह बाजरीची पेरणी केली. सध्या पिके अंकुरली असून, काही भागांत अधूनमधून पडणाऱ्या हलक्‍या पावसाने ही पिके तग धरून असली, तरी कोरडवाहू जमिनीतील पिकांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांनी ठिबकवर पाणी द्यायला सुरवात केली; परंतु विहिरींचा साठा अत्यल्प असल्याने सर्व काही पावसावर अवलंबून आहे. पाझर तलाव, धरणेही अद्याप कोरडीठाक आहेत. 

गंगापूर (बातमीदार) : एक महिना उलटूनही पाऊस न पडल्याने जामगाव शिवारातील संदीप लगड यांनी दहा एकरांतील मका पिकात जनावरे सोडून दिली आहेत. श्री. लगड यांनी सेवाश्रमाची जमीन कसायला घेतली होती. महिनाभरापासून पावसाने ओढ दिली असून खरीप पिके धोक्‍यात आली आहेत. पुढील चार दिवसांत पाऊस पडला नाही पडला, तर शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण होणार आहे. आता पिके सुकू लागली आहेत. पंधरा दिवसांपासून पावसास अनुकूल वातावरण आहे. आकाशात ढग येतात; पण पाऊस काही पडत नाही. उन्हाची तीव्रताही कमी झाली आहे.

कर्ज काढून बियाणे खरेदी
पाल (बातमीदार) - पाल (ता. फुलंब्री) परिसरात जमिनीत पुरेशी ओल असल्याने पिकांची उगवनही चांगली झाली; मात्र महिनाभरापासून पाऊस नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कोणी कर्ज काढून तर कोणी दागिने तारण ठेवून बी-बियाणे घेऊन लागवड केली आहे.

मोफत बियाणे द्यावीत
फुलंब्री (बातमीदार) - फुलंब्री तालुक्‍यात ५५ हजार हेक्‍टरवर खरीप पिकाची पेरणी पूर्ण झाली असून, शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. शेतकरी रवींद्र ढंगारे म्हणाले, की पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप केल्याने खरिपाची कोवळी पिके उन्हाने वाळू लागली आहेत. पाऊस वेळेवर पडला नाही तर दुबार पेरणी करावी लागेल. जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे यांनी सांगितले, की दुबार पेरणीची वेळ आलीच तर शासनाने शेतकऱ्यांना मोफत रासायनिक खते, बियाणे उपलब्ध करून द्यावीत.

लाडसावंगी मंडळ
लाडसावंगी (बातमीदार) - लाडसावंगी महसूल मंडळात ११ जुलैपर्यंत २५३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. मृग नक्षत्रात समाधानकारक पाऊस पडल्याने खरीप हंगामातील मका, बाजरी, तूर, कपाशी लागवडीसह पेरणी पूर्ण झाली आहे. पावसाने उघडीप देऊन २५ दिवस उलटले आहेत. शेतकऱ्यांनी पिकांतील आंतरमशागतीची कामे पूर्ण केली आहेत.

बनोटी येथे पावसासाठी साकडे
बनोटी (बातमीदार) - बनोटी (ता. सोयगाव) येथील महिलांनी मंगळवारी (ता. ११) पाऊस पडण्यासाठी महादेव मंदिरात साकडे घातले. बनोटी, वाडी, किन्ही, पळाशी, शिंदोळ, वडगाव, गोंदेगाव, पहुरी, हनुमंतखेडा परिसरात जूनमधील पहिल्याच पावसानंतर शेतकऱ्यांनी कपाशी लागवड केली. शेतकऱ्यांनी निंदणी, कोळपणी करून पिकास खतेही दिली; परंतु पाऊसच नसल्याने चिंता वाढली आहे. कपाशी, मकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतात जनावरे सोडावी लागली. दुबार पेरणीचे संकट अटळ आहे. सध्या मजुरांना काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.

हंड्याने पाणी देण्याची वेळ
दौलताबाद (बातमीदार) - माळीवाडा (ता. औरंगाबाद) परिसरात शेतकऱ्यांनी हंड्याने पाणी देऊन पिके जगविण्यासाठी आटापिटा सुरू केला आहे. दोन, तीन दिवसांत पाऊस न पडल्यास बहुतांश शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार आहे. कोरडवाहू जमिनीतील पिके वाळू लागली आहेत. आता शेतकऱ्यांमध्ये दुबार पेरणीची शक्ती राहिली नाही. सरकारने तातडीने पंचनामे करून बियाणे व पेरणीचा खर्च द्यावा, अशी मागणी होत आहे.

पिकांनी टाकल्या माना
लोहगाव (बातमीदार) : लोहगाव (ता. पैठण) परिसरात मृग नक्षत्राचा सहा जूनला २० मिलिमीटर पाऊस पडला. अधूनमधून पडलेल्या दोन ते चार मिलिमीटर पावसावर कशीबशी उगवण झालेली पिके तग धरून होती; परंतु कडक ऊन पडत असल्याने पिकांनी माना टाकल्या आहेत. लोहगाव बुद्रूक व खुर्दचे लागवडीयोग्य क्षेत्र १५९१.२६ हेक्‍टर असून, त्यापैकी ७५५ हेक्‍टरवर पेरणी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com