‘ती’ची घुसमट वाढतीच!

‘ती’ची घुसमट वाढतीच!

औरंगाबाद - महिलांवरील अत्याचारांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विशेष म्हणजे दिल्लीपासून गल्ली त्याला अपवाद राहिलेली नाही. भ्रष्टाचारासह देशभरात अन्य गुन्हेगारीवर मोठा गाजावाजा होतो, चिंतन होते. महिलांवरील अत्याचाराबाबत फारसे चिंतन, उपाययोजना होताना दिसत नाहीत. अत्याचारांच्या घटनांत वाढ, हे त्याचेच द्योतक आहे. महिला अत्याचाराला पायबंद घालण्यासाठी, ‘ती’ची घुसमट दूर करण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज आहे. किंबहुता ती एक चळवळ होण्याची गरज आहे. 

महिलांचे जीवनमान व त्यांची सुरक्षितता हा देशातील मोठा प्रश्‍न आहे. अनेकजणी व्यथित, कुंठित आयुष्य जगत आहेत. छेडछाड व त्यातून होणारा मानसिक त्रास ही अत्यंत गंभीर समस्या महाविद्यालयीन तरुणी, महिलांसमोर उभी ठाकत आहे. ब्लॅंक कॉल ते पाळत ठेवण्यापर्यंत आणि फेसबुक अकाउंट हॅकिंगपासून त्याद्वारे ब्लॅकमेलिंगपर्यंत आणि घरगुती हिंसाचाराचा महिलांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तंत्रज्ञान जसे बदलत जाते, तसे जगण्याचे परिमाण, जीवनाचे तंत्र, आपला परिसर व सोबतच माणसेही बदलत जातात. त्यात गुन्हेगारीचे स्वरूपही बदलते. बदलत्या काळात छेडछाडीचेही स्वरूपही बदलत आहे, ते उग्र होत आहे. ऑनलाईन छेडछाड हा प्रकार हल्ली जोर धरत आहे. व्हॉटस्‌ॲपवरून बीभत्स छायाचित्रे, व्हीडीओ, अश्‍लील मजकूर पाठवून आर्थिक पिळवणूक तसेच लैंगिक शोषणापर्यंत प्रकरणे घडत आहेत. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी अनेक तात्पुरते उपाय योजिले गेले. कायदेशीर प्रयत्नही झाले. महिलांवरील अत्याचार ही मानसिक विकृती असून ती रोखण्यासाठी आणखी ठोस उपाययोजनांची आवश्‍यक आहे.

बलात्कारांत वाढ
बलात्काराच्या गुन्ह्यांचा विचार केला असता, देशात २०१५ मध्ये ३४ हजार ६५१ गुन्हे नोंदवले गेलेत. यात अल्पवयीनांसंबंधी गुन्हे वगळले आहेत. २०११ ते २०१४ दरम्यान सातत्याने बलात्काराच्या गुन्ह्यांत वाढ झाली. २०१५ मध्ये थोडेसे कमी झालेले प्रमाण २०१६ व १७ मध्येही कमालीचे वाढल्याचे चित्र आहे.

शंभरामागे दहा महिलासंबंधित गुन्हे
राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाची आकडेवारी सांगते की, आयपीसी कलमांतर्गत देशातील एकूण गुन्ह्यांत महिलांच्या गुन्ह्यांचे प्रमाण अत्यंत गंभीर आहे. २०११ ला हे प्रमाण ९.४, २०१२ ला १०.२, २०१३ ला ११.२, २०१३ मध्ये ११.४, २०१५ मध्ये १०.७ टक्के होते. अर्थातच शंभर गुन्ह्यांमागे दहा गुन्हे महिलांशी संबंधित असून त्यात बलात्काराच्या दोन गुन्ह्यांचा हमखास समावेश असतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com