तरुणाईला लागली ‘लुडो’ची चटक!

संदीप लांडगे
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

औरंगाबाद - डोरोमॅन, क्रिश अशा नानाविध गेम्सचे वेड तरुणाईला लागल्यानंतर आता मोबाईलवर चक्क जुगार खेळला जातोय, विश्‍वास बसनार नाही ना; पण ही बाब खरीय. लुडो नावाच्या ऑनलाइन जुगाराने तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनाही चटक लावली आहे. जिथे जागा मिळेल, तिथे आपले बस्तान बसवून दहा रुपयांपासून हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम या नवख्या जुगारावर लावली जात असल्याचे चित्र आहे.

औरंगाबाद - डोरोमॅन, क्रिश अशा नानाविध गेम्सचे वेड तरुणाईला लागल्यानंतर आता मोबाईलवर चक्क जुगार खेळला जातोय, विश्‍वास बसनार नाही ना; पण ही बाब खरीय. लुडो नावाच्या ऑनलाइन जुगाराने तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनाही चटक लावली आहे. जिथे जागा मिळेल, तिथे आपले बस्तान बसवून दहा रुपयांपासून हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम या नवख्या जुगारावर लावली जात असल्याचे चित्र आहे.

 मोबाईल क्रांतीमुळे जग मुठीत आले आहे. या क्रांतीचा सदुपयोगासोबतच दुरुपयोगही वाढत असून, चक्क मोबाईलवर जुगारही खेळला जात आहे. अशा प्रकारचे काही ॲप्सच आता उपलब्ध झाले असून, ते डाऊनलोड केले जात आहेत. कॉलेजपासून गल्लीबोळापर्यंत ‘लुडो किंग’ या नवीन गेमचे एकप्रकारे अनेकांना व्यसनच लागले असून, चक्क पैशांवर हा जुगार खेळला जात आहे. लुडो किंग गेम खेळण्यासाठी जास्त काही साधनांची आवश्‍यकता नाही. यासाठी गरज असते केवळ एका अँड्रॉइड फोनची. त्यामध्ये लुडो किंग हा गेम डाऊनलोड करून हा गेम खेळू शकतात. हा जुगार पानटपरी, कॉलेजकट्टा, ओट्यावर, गल्लीबोळात; तसेच जुगार अड्ड्यावरही खेळला जात आहे.

असा खेळतात जुगार...
लुडो किंग हा जुगार दोन ते चार जणांत राउंड पद्धतीने पैशांवर खेळला जातो. हा गेम चंफुलसारखा असून, ज्या व्यक्तींच्या चार कवड्या सर्वांत लवकर निश्‍चित केलेल्या घरात जातील तो विजेता ठरतो. यात पहिल्या विजेत्याला जुगाराची एक तृतीयांश रक्कम व दुसऱ्याला उर्वरित रक्कम दिली जाते. दहा ते एक हजार रुपयांपर्यंत जुगार खेळला जातो. 

हे आहेत दुष्परिणाम
लुडो किंग हा मोबाईल गेम जुगारच असून, तो तरुणाईसाठी घातक ठरू शकतो. अनेकजण पैशांवर जुगार खेळत असल्याने अनेकांना आर्थिक झळ बसत आहे. यातूनच आपसांत वादविवाद होत असून, तरुणाई दिवसातील अनेक तास वाया घालविताना दिसत आहे.

दारू, तंबाखू, सिगारेटप्रमाणेच गेमचे व्यसन जडलं की ते सहजासहजी सुटत नाही. सतत गेम खेळण्यामुळे मुलांच्या मेंदूत बदल होतात. त्यामुळे मुले इतर गोष्टींवर, अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. काही वर्षांत याला आजार म्हणूनही घोषित करण्यात येईल. हा आजार समुपदेशानाने बरा करता येईल; परंतु हे उपचारही व्यसनाच्या प्रमाणावर अवलंबून असेल.
- डॉ. माणिक भिसे, मनोविकारतज्ज्ञ

स्मार्ट फोनचा सदुपयोग न होता गैरवापरच अधिक होत आहे. याचे दुष्परिणामही घडत आहेत. पैशांवर हा जुगार खेळला जात असून, अशा गेममुळे मुलांचे नुकसान होते. पालकांनी तरुणांना अशा गेमपासून दूर ठेवणे योग्य ठरेल.
- ताराचंद गायकवाड (पालक)