व्हय, लाभार्थी निवडलेच नाहीत!   

व्हय, लाभार्थी निवडलेच नाहीत!   

औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज मागवून तीन महिने झालेत. त्यासाठी शासनाने तब्बल १ कोटी ४४ हजार रुपयांच्या निधीची तरतूदही केली. गरजूंनी मोठ्या अपेक्षेने अर्ज केले; मात्र आतापर्यंत लाभार्थींची अंतिम यादीच तयार होत नसल्याने योजनेचा लाभ कधी मिळणार, हा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. 

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी मदत व्हावी, म्हणून जिल्हा परिषदेच्या अनेक योजना आहेत. त्या अनुषंगाने पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी विशेष घटकांतील ३ हजार ८९ नागरिकांकडून तीन महिन्यांपूर्वी अर्ज घेतले. त्यातून गायींचे वाटप करण्यासाठी ३१ लाभार्थींची निवड करण्यात येणार आहे. यासाठी ७७९ अर्ज या विभागाकडे प्राप्त झाले आहेत. शेळी गटासाठी १६८ लाभार्थींची निवड करण्यात येणार असून, यासाठी १ हजार ४१० अर्ज प्राप्त झाले आहेत. एकात्मिक कुक्‍कुट विकास कार्यक्रमासाठी २५ लाभार्थींची निवड केली जाणार असून, यासाठी ८१ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ‘मैत्रीण’ या मुलींसाठी असलेल्या शेळी वाटप करण्याच्या योजनेसाठी ७६ लाभार्थी निवडले जाणार असून, यासाठी ३९८ अर्ज दाखल झाले आहेत. कडबा कटर वाटप करण्यासाठी ४१ लाभार्थी निवडले जाणार आहेत. यासाठी ४२१ अर्ज या विभागाकडे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, संबंधितांनी अद्यापही अंतिम लाभार्थींची निवड केली नाही. त्यामुळे अर्ज केलेल्या व्यक्ती याबाबत विचारणा करत आहेत.      

या योजनेला प्रतिसाद नाही 
पशुखाद्यासाठी आणि प्रशिक्षणासाठी प्रत्येकी १३३ व २०० लाभार्थी निवडायचे आहेत; मात्र यासाठी प्रतिसाद मिळालेला नाही. दरम्यान, वैरण विकास योजनेअंतर्गत प्रोटीनयुक्‍त व दुग्धोत्पादन वाढीसाठी पूरक असणाऱ्या यशवंत व जयवंत गवताचे ठोंब वाटप करण्यात येतात, यासाठी अद्याप अर्ज मागवण्यात आलेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. 

अशी आहे निधीची तरतूद
गाय वाटप ................................. २५ लाख 
शेळी वाटप................................. ९० लाख
खाद्यपुरवठा................................. ५ लाख
प्रशिक्षण .................................... २ लाख
एकात्मिक कुक्‍कुट विकास कार्यक्रम ...... २ लाख
मैत्रीण योजना............................... १५ लाख
कडबा कटर.................................. ५ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com