औरंगाबादेतील दंगलीत पोलिस कार्यकर्त्यांसारखे वागले : धनंजय मुंडे

In Aurangabad riots Police works like workers
In Aurangabad riots Police works like workers

औरंगाबाद : दोन ते अडीच महिन्यांपूर्वी शहरात किरकोळ भांडणावरून दंगल होण्याची शक्‍यता गुप्तचर विभागाने व्यक्‍त केली. तसा प्रस्तावदेखील वरिष्ठांना सादर करण्यात आला होता. त्यावर कारवाई करण्याऐवजी ती माहिती दाबून ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी येथे केली. तसेच या दंगलीत पोलिस कार्यकर्त्यांसारखे वागताना दिसले असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या खासदार, माजी आमदार, नगरसेवक दिसत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

शहरात दोन गटात हाणामारीनंतर शुक्रवारी (ता.11) रात्री उसळलेल्या दंगलीत अनेक वाहने, दुकाने घरे पेटवून देण्यात आली. आता राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी एकमेकांवर आरोपांचे सत्र सुरू झाले आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. 15) दुपारी मुंडे यांनी दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर सुभेदारी विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. 

ते म्हणाले, "ही दंगल हिंदू - मुस्लिम वाटत नाही. त्याला नंतर तसा रंग देण्यात आला. अडीच महिन्यांपूर्वी स्थानिक गुप्तचर विभागाने त्यांच्या वरिष्ठांना दिलेल्या अहवालात शहरातील संबंधित भागात किरकोळ भांडणे होण्याची शक्‍यता असून, त्याचे रूपांतर दंगलीत होऊ शकते, अशी शक्‍यता व्यक्‍त केली होती. त्यावर कारवाई करण्याऐवजी ती माहितीच दाबून ठेवली. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे. महापालिकेतील सत्तापक्षातील एक नगरसवेक हप्ते मिळत नाहीत म्हणून लूट करतो. 

अतिक्रमण काढायला, नळ जोडणी तोडायला लावतो, हे कुणाच्या सांगण्यावरून होते? केवळ पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या दंगलीत दोघांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश जळालेली दुकाने ही हिंदूंची आहेत. मात्र, त्यांचे भाडेकरू मुस्लिम होते. यास खासदार, माजी आमदार, नगरसेवक जे कुणी जबाबदार आहेत, त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे.'' 

मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत मुंडे पुढे म्हणाले, की राज्यात मोठी घटना घडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: यायला हवे. मात्र, ते गृहराज्यमंत्र्यांना पुढे करीत आहेत. अगोदर पोलिसांच्या मदतीने दंगे घडवायचे आणि नंतर कॉम्बिंग ऑपरेशन करून निष्पाप लोकांना त्रास द्यायचा, हे आता लोक सहन करणार नाहीत. यावरून राज्यात गृहविभाग आहे की नाही, असा सवालही मुंडे यांनी उपस्थित केला. यावेळी आमदार सतीश चव्हाण, कमाल फारूकी, कदिर मौलाना, अभिजित देशमुख उपस्थित होते. 

प्लॉटकडे जाण्यास रस्ता मिळावा म्हणून... 

दंगलग्रस्त भागात एका माजी आमदाराचा प्लॉट आहे. तेथे जाण्यासाठी रस्ता नाही. त्यामुळे या प्लॉटच्या आजूबाजूची काही दुकाने जाळली आहेत. स्वत:ची खळगी भरण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या एका माजी आमदाराने हे पाऊल उचलले असल्याचा आरोप मुंडे यांनी यावेळी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com