बारावीच्या परीक्षेचे निलजगाव केंद्र रद्द

उर्वरित परीक्षा बिडकीनच्या सरस्वती भुवन केंद्रावर होणार
Niljagaon center of 12th standard examination declared void aurangabad
Niljagaon center of 12th standard examination declared void aurangabadsakal

औरंगाबाद : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षेला शुक्रवारी सुरवात झाली. परंतु, इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला निलजगाव येथील लक्ष्मीबाई विद्यालय केंद्रावर मोठ्या प्रमाणावर सुविधांचा अभाव आढळून आला. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर शिक्षण विभागाने तत्काळ दखल घेत या महाविद्यालयाची कायमस्वरूपी मान्यता रद्द करण्याची शिफारस शिक्षण उपसंचालक यांच्याकडे तर मंडळ मान्यता रद्द करण्याची शिफारस विभागीय मंडळाकडे शनिवारी करण्यात आली. तसेच येथील उपकेंद्र तत्काळ रद्द करून केंद्रावरील १५१ विद्यार्थ्यांची पुढील परीक्षा बिडकीन येथील सरस्वती भुवन उच्च माध्यमिक विद्यालयात घेण्यात येणार आहे, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दिली.

दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावरील भौतिक सुविधांच्या अनुषंगाने १५ फेब्रुवारीला देवगिरी महाविद्यालयाच्या रवींद्रनाथ टागोर सभागृहात जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन, माध्यमांच्या प्राचार्य, मुख्याध्यापकांची आढावा बैठक शिक्षण विभागातर्फे घेण्यात आली होती. यावेळी शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख यांनी दहावी, बारावीच्या केंद्र-उपकेंद्रावर विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था, भौतिक सुविधा व्यवस्थित असावी अशा सूचना दिल्या होत्या. तसेच सुविधांचा अभाव किंवा गैरप्रकार आढळून आल्यास त्या शाळा, विद्यालय केंद्राकडून एक लाख रुपये दंड वसूल करून मंडळ मान्यता रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील दिला होता. बैठकीत निलजगाव येथील शाळेने १२४ विद्यार्थी प्रवेश, १८ बाय २२ च्या सहा वर्ग खोल्या, १२४ बेंच आणि चार शिक्षक, मुलांसाठी स्वच्छतागृह असल्याची माहिती खात्रीपूर्वक असल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते.

तफावत आढळल्यास मी जबाबदार राहील असे प्रमाणपत्र तेथील मुख्याध्यापकाने दिले होते. शाळेच्या माहितीवर विश्वास ठेवून उपकेंद्र म्हणून निलजगाव केंद्राला मान्यता दिली होती. मात्र, शुक्रवारी (ता.चार) इंग्रजी पेपरच्या वेळी केंद्रप्रमुख संजीव देवरे यांनी केंद्राला प्रत्यक्ष भेट दिली असता पेपरला १५१ विद्यार्थी प्रविष्ट होते. तर १४८ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले.

तरीही चुकीची माहिती देऊन तसेच भौतिक सुविधा नसताना बारावीचा इंग्रजीचा पेपर या शाळेत झाला. त्याचा सचित्र भांडाफोड शनिवारी (ता.पाच) ‘सकाळ’च्या माध्यमातून करण्यात आला होता. या वृत्ताची शिक्षण विभागाने तातडीने गंभीर दखल घेतली.

सुटीच्या दिवशीही बैठक

शनिवारी सुटीच्या दिवशीही गटशिक्षणाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन शाळेच्या भौतिक सुविधांची खातरजमा केली. ही ‘लिटमस टेस्ट’ होती. पुढे असे प्रकार घडू नये. त्यामुळे शंका असलेल्या शाळांच्या सुविधांची सोमवारपर्यंत खातरजमा करण्याचे आदेश शिक्षणाधिकारी देशमुख यांनी दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com