ऑरिकच्या मार्केटिंगसाठी कंबर कसणार

ऑरिकच्या मार्केटिंगसाठी कंबर कसणार

औरंगाबाद - ‘‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीच्या (ऑरिक) मार्केटिंगसाठी केंद्र सरकारतर्फे गुंतवणूक परिषद घेतली जाईल. वेबसाईट, जाहिराती, प्रदर्शन, इव्हेंट यांच्या माध्यमांतून ऑरिकवर आता आम्ही फोकस करणार आहोत,’’ अशी माहिती केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन खात्याचे अतिरिक्त सचिव संजीव गुप्ता यांनी दिली.

शेंद्रा-बिडकीन औद्योगिक पार्कमधील कामांचा आढावा घेण्यासाठी श्री. गुप्ता, ‘डीएमआयसी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्केश शर्मा गुरुवारी (ता.११) शहरात आले असता, बोलत होते.

‘शेंद्रा येथील काम सध्या सर्वांत पुढे आहे, हे आपणास ठाऊकच आहे. त्यात आगामी काळात गती येईल. टाईमलाइननुसार सर्व कामे केली जातील. भूखंड वाटपाचे काम सप्टेंबरअखेर किंवा ऑक्‍टोबरमध्ये सुरू होईल. शेंद्राची कटऑफ डेट ही सप्टेंबर २०१८ आहे. त्यापूर्वीच येथील कामे झालेली असतील. गरजेनुसार कंत्राटदारास आणखी कालावधी वाढवून देऊत. मात्र, तशी गरज पडणार नाही, असे वाटते. बिडकीनमध्ये लवकरच काम सुरू होईल. कनेक्‍टीव्हीटीवरही आम्ही भर देत आहोत. विमानतळापासून शेंद्रा फक्त दहा किलोमीटरच्या अंतरावर आहे, ही जमेची बाजू आहे.’’

‘ऑरिक ही स्मार्ट सिटी राहणार आहे. येथे सामाजिक, पायाभूत, माहिती व संवाद तंत्रज्ञान यांसारख्या प्रत्येक सुविधेमध्ये स्मार्टनेस दिसेल. हायस्पीड इंटरनेट कनेक्‍टीव्हीटी म्हणजे स्मार्टसिटी असे नाही. उद्योगांपासून येथील रहिवाशांपर्यंत सर्वांसाठी स्मार्ट ॲप्लीकेशन्स असतील. पहिल्या टप्प्यातील स्मार्ट सिटीतील लोकसंख्या ५५ हजार असेल. आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि निम्नस्तरावरील घटकांचीही काळजी या स्मार्ट सिटीत घेतलेली असेल. ११ ते १२ टक्के जागा त्यासाठी राखीव ठेऊत,’’ असेही श्री. गुप्ता म्हणाले.

शेंद्रा सर्वांत पुढे

‘डीएमआयसीअंतर्गत देशात पहिल्या टप्प्यात सात नोडस्‌चे काम सुरू आहे. त्यात शेंद्रा-बिडकीन बरेच पुढे आहे. देशाचा विचार केल्यास उज्जैनजवळील विक्रम उद्योग पुरी, दिल्लीजवळील ग्रेटर नोएडा, अहमदाबादजवळील ढोलेरा आणि औरंगाबादजवळील शेंद्रा-बिडकीन येथील कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. शेंद्रा- बिडकीन येथील गतीने आणि दर्जेदारपणे सुरू असलेली कामे बघता, शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीत नेतृत्व करतील, यात शंका नाही. बिडकीनमध्ये पहिल्या टप्प्यातील काम सुरू होईल. तेथील काम याच कंत्राटदारामार्फत करायचे किंवा नाही हे अद्याप ठरलेले नाही. त्याची पहिल्या टप्प्याची स्वतंत्र निविदा लवकरच निघेल. सप्टेंबर महिन्यापासून ही प्रक्रिया सुरू होईल. निविदेनंतर जलवाहिनी, वीजवाहिनी यांचे काम हाती घेतले जाईल. माहिती व संवाद तंत्रज्ञान (आयसीटी) इमारतीचे काम थोड्या उशिराने होईल,’’ अशी माहिती श्री. गुप्ता यांनी दिली.

इलेक्‍ट्रॉनिक्स उद्योगांसाठी भरघोस सवलती

ऑरिकमधील गुंतवणुकीसंदर्भात बोलताना अल्केश शर्मा यांनी, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि इतर बहुराष्ट्रीय कंपन्या येथे गुंतवणुकीमध्ये रस दाखवत असल्याचे सांगितले. ‘‘अनेक कंपन्यांनी येथे येऊन जागेची पाहणीही केली आहे. शेवटी गुंतवणूकदारांवर गुंतवणूक कोठे करायची ते अवलंबून असते,’’ अशीही माहिती त्यांनी दिली. यावेळी गुंतवणुकीसंदर्भात श्री. गुप्ता म्हणाले, ‘‘उद्योग खात्याने गुंतवणुकीसाठी फार मोठी सवलत जाहीर केली आहे. तीन हजारांहून अधिक रोजगार निर्माण होत असेल तर जेवढा व्हॅट आणि सीएसटी जमा होईल, त्याच्या दुप्पट सवलत आम्ही देऊत. ही सवलत मात्र, इलेक्‍ट्रॉनिक उद्योगांसाठीच असेल. मला वाटते अनेक उद्योग स्थलांतरित होऊन येथे येतील.’’ याचवेळी अपूर्व चंद्रा यांनी ‘‘इलेक्‍ट्रॉनिक उद्योगांतर्फे गुंतवणूक जास्त होते. या उद्योगांमार्फत कमी जागेत जास्त रोजगार उपलब्ध होतात. टेक्‍सटाईल उद्योगांचेही असे असते. गुंतवणूक कमी असली तरी रोजगार जास्त असतो,’’ अशी माहिती दिली. इटालियन कंपनी ‘कोहेम’ने गेल्या महिन्यात पाहणी केली. ते सोलार पॅनेलसाठी लागणारी फिल्म तयार करतात. मात्र, त्यांची जागेची मागणी कमी आहे. त्यांना पाच एकरच जागा हवी आहे, अशी माहितीही या वेळी कळाली.

गुंतवणूकदारांची अंतिम निवड असेल 

देशपातळीवरील ऑरिकच्या मार्केटिंगविषयी नियोजन सांगताना श्री. गुप्ता म्हणाले, ‘‘ढोलेराच्या तुलनेत ऑरिकला फारशी प्रसिद्धी मिळत नाही, असे दिसते. मात्र, यापुढे आता आम्ही ऑरिकची जोरदार मार्केटिंग करणार आहोत. वेबसाईट, जाहिराती, प्रदर्शनी, इव्हेंट यांच्या माध्यमातून ऑरिकवर आता आम्ही फोकस करणार आहोत. त्यासाठी आम्ही गुतंवणूकदारांच्या परिषदाही घेणार आहोत. ऑरिकची थोडक्‍यात माहिती सांगणारा व्हीडीओ, फोटो, माहिती आम्ही भारत सरकारच्या वेबसाईटवर अपलोड करणार आहोत. विविध माध्यमांतून मार्केटिंग केली जाईल. गुंतवणूकदाराची अंतिम निवड ही ऑरिक असावी, असा आमचा प्रयत्न असेल. ढोलेराचे म्हणाल तर, तेथून अहमदाबादचे विमानतळ अडीच तासांवर आहे, येथे तर दहा मिनिटांच्या अंतरावर विमानतळ आहे. याचाही विचार गुंतवणूकदार करतात. शेवटी गुंतवणूक कुठे करायचा हा निर्णय त्यांचा असतो.’’

शेंद्रा-बिडकीनची केली पाहणी

डीएमआयसी ट्रस्टने पंधरा दिवसांपूर्वी बिडकीन येथील पायाभूत सुविधांसाठी ६,८८० कोटींना मंजुरी दिली. त्या पार्श्वभूमीवर श्री. गुप्ता आणि श्री. शर्मा यांनी गुरुवारी औरंगाबादला भेट दिली. शेंद्रा येथे त्यांनी उद्योग खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यानंतर शेंद्रा येथील कामांची पाहणी केली. बिडकीन येथील साईटचीही त्यांनी पाहणी केली. यावेळी ‘औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशीप लि.’चे (एआयटीएल) अध्यक्ष व उद्योग खात्याचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार, संचालक भास्कर मुंडे, डीएमआयसीचे सरव्यवस्थापक गजानन पाटील, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी शुभम वायाळ, कार्यकारी अभियंता आर. एस. कुलकर्णी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com