एजंटांना हुसकाविण्यासाठी वाहनांवर सरसकट कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 जुलै 2017

‘आरटीओ’त आलेल्या वाहनांची अचानक तपासणी, अर्ध्या तासात २६ हजार दंड वसूल 

औरंगाबाद - आरटीओ कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची बुधवारी (ता. २६) अचानक तपासणी करण्यात आली. अचानक केलेल्या तपासणीने वाहनधारकांची पळापळ झाली. या कारवाईत ५८ वाहने जप्त करण्यात आली. यातून २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

राज्यातील आरटीओ कार्यालयातील दलाली मोडीत काढण्यासाठी गेल्या आठवड्यात परिवहन विभागाने फतवा जारी केला आहे. विशेष म्हणजे स्टिंग ऑपरेशन करून थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप औरंगाबाद आरटीओ कार्यालयाने थेट दलालांवर कुठलीही कारवाई केलेली नाही. असे असतानाच बुधवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास ही वाहन तपासणी करण्यात आली. आरटीओ कार्यालयाचे दोन्ही गेट बंद करून घेण्यात आले. त्यानंतर आवारातील वाहनांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. आरटीओ कार्यालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणावर दलालांची चारचाकी व दुचाकी वाहने उभी असतात. त्यामुळे ही कारवाई केल्याचे अधिकारी सांगत आहेत. यात केवळ पाच सहा एजंटांच्या चारचाकी आणि सात-आठ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली. उर्वरित नागरिक हे आरटीओ कार्यालयात विविध कामांनिमित्त आलेले होते. वाहनांचा विमा नसणे, कागदपत्र सोबत न बाळगणे, परवाना नसणे अशा विविध कारणांनी चार सहायक मोटार वाहन निरीक्षकांनी ही कारवाई केली.

वाहनधारकांना दोन ते पाच हजार रुपयांपर्यंत एकूण २६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ज्यांच्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नव्हते त्यांचे वाहन अडकवून ठेवण्यात आले.