बहुजन क्रांतीचा अतिविशाल मूक मोर्चा

bahujan kranti morcha in aurangabad
bahujan kranti morcha in aurangabad

औरंगाबाद - ऍट्रॉसिटी कायदा कडक करून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, यांसह विविध मागण्यांसाठी येथे शुक्रवारी (ता. चार) बहुजन क्रांतीचा अतिविशाल मूकमोर्चा काढण्यात आला. अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत हा मोर्चा निघाला. तब्बल चार ते साडेचार तास चाललेल्या या मोर्चाचे पहिले टोक आमखास मैदानात, तर शेवटचे टोक क्रांती चौकात होते. महाविद्यालयीन तरुणींनी मागण्यांच्या निवेदनाचे वाचन केले आणि ते पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांना दिले. त्यानंतर आमखास मैदानावर मोर्चाची सांगता झाली. मोर्चा संपल्यानंतर आमखास मैदानापासून फुटणारे चारही दिशांचे रस्ते मोर्चेकऱ्यांनी ओसंडून गेले.

क्रांती चौकातून बौद्ध भिक्‍खूंच्या उपस्थितीत तरुणींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर बाराच्या सुमारास या अभूतपूर्व मोर्चाला सुरवात झाली. अतिशय शिस्तबद्ध असलेल्या या मोर्चात सर्वांत पुढे महिला व तरुणींचा समावेश होता. स्वयंसेवकांनी सकाळपासूनच सर्व यंत्रणा एकहाती सांभाळत एका बाजूने महिला, तर दुसऱ्या बाजूने पुरुषांच्या रांगा तयार केल्या. क्रांती चौकात सकाळपासूनच औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातून मोर्चासाठी जत्थेच्या जत्थे दाखल होत होते. सुरवातीला सिल्लेखाना चौकापर्यंत मोर्चासाठी शिस्तबद्ध रांग तयार करण्यात आली. यानंतर मोर्चाला प्रत्यक्ष सुरवात झाली. निळे, पिवळे, हिरवे व पंचशील ध्वज घेऊन विविध घोषणा, मागण्यांचे फलक हाती घेऊन मोर्चेकरी शांततेत चालत होते. विशेषत: यामध्ये महिला व तरुणींचा सहभाग लक्षणीय होता. रस्त्याच्या मध्ये सिल्लेखाना येथे मुस्लिम बांधवांतर्फे पाण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. टिळकपथ येथे पाणीबॅंकेतर्फे पाण्याची मुबलक व्यवस्था करण्यात आली होती. मोर्चा सुरू झाला, त्या वेळी सिल्लेखान्यापासून टिळकपथ, गुलमंडी, औरंगपुरा भागांतील दुकानदारांनी आपले व्यवहार काही तासांसाठी बंद ठेवून मोर्चाला समर्थन दिले. सुमारे पावणेदोनच्या सुमारास मोर्चा आमखास मैदानात दाखल झाला. मोर्चाच्या मार्गावर औरंगपुरा येथे महात्मा फुले चौकात जोतीराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. मिलकॉर्नर येथे राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा, तर भडकलगेट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले. स्वयंसेवकांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी 200 वॉकीटॉकींची व्यवस्था करण्यात आली होती.

बुद्धवंदना, विद्यार्थिनींची भाषणे
मूकमोर्चा दाखल होण्यापूर्वीच हळूहळू आमखास मैदान भरण्यास सुरवात होत होती. या ठिकाणी कोणत्याही नेत्याला व्यासपीठावर स्थान नव्हते. त्यांच्याऐवजी भिक्‍खू संघ आणि आठ महाविद्यालयीन तरुणी उपस्थित होत्या. मूकमोर्चातील शेवटच्या टप्प्यातील मोर्चेकरी पोचल्यानंतर भदन्त बोधीपालो महाथेरो यांनी त्रिशरण, पंचशील व बुद्धवंदना घेतली व विद्यार्थिनींच्या भाषणांना सुरवात झाली. प्रतीक्षा वाकेकर, शाहीन शेख, मयूरी दाभाडे, अपूर्वा दांडगे, मनीषा वाघमारे यांनी ऍट्रॉसिटी कायदा, मुस्लिम समाजाचे प्रश्‍न, दलितांवरील अत्याचार आणि ऍट्रॉसिटी कायद्याची गरज या विषयांशी निगडित अतिशय परखडपणे, अभ्यासपूर्ण मते मांडली. सविता हिवराळे यांनी मोर्चेकऱ्यांच्या निवेदनाचे वाचन करून सर्व तरुणींनी मिळून पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांना मागण्यांचे निवेदन दिले. शुभांगी बनकर व सविता हिवराळे यांनी सूत्रसंचालन केले. रोहिणी खरात हिने आभार मानले.

मूकमोर्चातील मागण्या

- ऍट्रॉसिटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. या कायद्याची अंमलबजावणी करण्यात कुचराई करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचारी, सामाजिक न्याय विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच या कायद्याशी संबंधित शासनयंत्रणेला जबाबदार धरून त्यांच्या विरोधात कारवाई करावी. ऍट्रॉसिटीची प्रकरणे विशेष न्यायालयात चालवून सहा महिन्यांत निकाली काढावीत. ऍट्रॉसिटीबरोबरच राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
- दलित असो अथवा सवर्ण महिलांवरील बलात्कार प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे. विशेष न्यायालयात अशी प्रकरणे चालवून सहा महिन्यांत निकाली काढावीत.
- ओबीसी कोट्यातून इतर कोणत्याही समाजाला आरक्षण न देता घटनेत विशेष तरतूद करून इतर समाजाला स्वतंत्रपणे आरक्षण देण्यात यावे.
- देशातील जमिनी, उद्योगांचे राष्ट्रीयीकरण करून सर्वांना समान न्याय, समान संधी व समान संपत्ती देण्यात यावी.
- राज्यातील सर्व सहकारी साखर कारखाने राज्य शासनाने ताब्यात घेऊन ते चालवावेत. जे सहकारी साखर कारखाने बेकायदेशीरपणे अवसायनात काढून त्यांची चुकीच्या मार्गाने विक्री करून खासगी मालकांच्या हवाली करण्यात आले आहेत, ते शासनाने परत घेऊन या सर्व चुकीच्या विक्री प्रक्रियेची चौकशी करावी आणि दोषींवर कडक कारवाई करावी.
- लहुजी साळवे आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात.
- भटक्‍या विमुक्‍तांसाठी रेणके आयोग त्वरित लागू करावा.
- मुस्लिम समाजाला आरक्षण देऊन विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सच्चर समितीच्या शिफारशींची त्वरित अंमलबजावणी करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com