इंग्लंडच्या महिलेने घातला बॅंक व्यवस्थापकाला गंडा

इंग्लंडच्या महिलेने घातला बॅंक व्यवस्थापकाला गंडा

औरंगाबाद - फेसबुकवरून ओळख झाली. त्यानंतर चॅटिंगमधून मैत्री वाढत गेली. ती इंग्लंडहून भेटण्यासाठी भारतात येणार म्हणून, त्यानेही तिचे स्वागत केले. पण मध्येच दिल्लीत कस्टम अधिकाऱ्याने पकडले अन्‌... माझ्याकडे भारतीय चलनच नाही, म्हणून तिने त्याला पैसे मागितले. त्यानेही थोडेथोडके नव्हे तब्बल दोन लाख नव्वद हजार रुपये तिच्या बॅंक खात्यात भरले पण शेवटी ती फसवी निघाली अन्‌ फेसबुकवरच्या दिवट्या मैत्रीतला पोकळपणा उघड झाला.

इंग्लंडस्थित फेसबुक मैत्रिणीने नवोदित बॅंक व्यवस्थापकाला आधी माझ्याकडे 12 कोटी रुपये आहेत. मी इंग्लंडहून भारतात आल्यावर आपण भेटू, असे आमिष दाखविले. इंग्लंडहून भारतात आल्यावर दिल्ली विमानतळावर कस्टम अधिकाऱ्यांनी पकडल्याची थाप मारून त्या कथित फेसबुक फ्रेंडने बॅंक व्यवस्थापकाला तब्बल दोन लाख 90 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दीपक अटल (ह. मु. महेशनगर, मूळ इंदोर) हे शहरातील जिन्सी भागातील खासगी बॅंकेत प्रशिक्षणार्थी व्यवस्थापक म्हणून रुजू आहेत. अटल यांची पाच ते सहा महिन्यांपूर्वी फेसबुकवर इंग्लंडस्थित डायना जेनेथ या महिलेशी ओळख झाली. त्यानंतर दोघे नियमित चॅटिंग करू लागले. तिने अटल यांचा विश्‍वास संपादन केला. दरम्यान, भेटण्यासाठी आपण बारा जानेवारीला भारतात येत असल्याची माहिती तिने अटल यांना दिली. विशेषतः तिने विमानाचे तिकीटही अटल यांना मेलद्वारे पाठविले. 12 जानेवारीला डायनाने आपण दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोचल्याची अटल यांना माहिती दिली. आपल्याकडे इंग्लंडचे चलन असून, भारतीय चलन हवे असल्याची थाप तिने मारली. तसेच कस्टम अधिकाऱ्यांनी माझी अडवणूक केल्याचेही सांगत तिने भारतीय चलन ट्रान्सफर करण्याची मागणी केली. भुरळ पडलेल्या अटल यांनी महिलेवर अतिविश्‍वास दाखवून तिच्या बॅंक खात्यात दोन लाख 90 हजार रुपयांचा भरणा केला. पण नंतर फसगत झाल्याचे लक्षात आल्याने अटल यांनी जिन्सी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, डायना जेनेथ या महिलेविरुद्ध बुधवारी (ता. 25) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार, गुन्ह्याची नोंद झाली. तपास जमादार भाऊसाहेब जगताप करीत आहेत.

पुन्हा पैसे मागितल्याने आला संशय
डायनाने सांगितलेली रक्कम पाठवूनही 13 जानेवारीला तिने पुन्हा फोन करून कस्टमचे अधिकारी पैसे मागत असल्याचे सांगत आणखी दोन लाखांची मागणी केली. हीच बाब अटल यांना खटकली व संशय बळावला. त्याने ही बाब परिचितांना सांगितल्यानंतर फसवणूक झाल्याचे समोर आले.

महिलांच्या नावे फेक अकाउंट तयार करून देशी-विदेशी भामटे उद्योजक, व्यापारी व नोकरदारांना फसवतात. मनी लॉंडरिंग, व्यावसायिक भागीदारी आदी थापा मारल्या जातात. अशा फेक अकाउंटस्‌वर विश्‍वास ठेवू नका. प्रत्यक्ष भेट घेऊन खात्री झाल्याशिवाय व्यवहार करू नका, असे आवाहन सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com