लग्नासाठी बॅंक पैसे देईना! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

औरंगाबाद - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर लग्नासाठी ठरवून दिलेले पैसेही बॅंका देत नसल्याने लग्नसमारंभ करणाऱ्यांना लग्न करावे की नाही असे झाले आहे. असाचा काहीसा प्रकार नांदरच्या (ता. पैठण) किरण पाटील यांच्याबाबत घडला आहे. चार दिवसांवर लग्न येऊन ठेपले असताना पैसे काढण्यासाठी गेल्यानंतर आमच्याकडे पैसे नसल्याचे बॅंकेतर्फे सांगण्यात आले. 

नांदर येथील किरण पाटील यांचे सोमवारी (ता. पाच) लग्न आहे. यासाठी लागणारे पैसे काढण्यासाठी ते बुधवारी (ता.30) सिडको, एन-सात येथील बॅंकेत गेले. लग्नपत्रिका दाखवून यासाठी लगाणारी अडीच लाख रुपयांची स्लिप भरली; मात्र बॅंकेत पैसेच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. पाटील यांचे देवगिरी बॅंकेत करंट अकाउंट आहे. तरीही त्यांना पैसे नाकारण्यात आले. रिझर्व्ह बॅंकेने लग्न समारंभासाठी अडीच लाख रुपये बॅंकेतून काढता येतील, अशी सुविधा केली आहे; मात्र बॅंकेकडे तेवढ्या प्रमाणात पैसे नसल्यामुळे बॅंकांना लग्न समारंभासाठी हवी असलेली रक्‍कम उपलब्ध करून देता येत नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. 

लग्नासाठी लागणाऱ्या अडीच लाख रुपयांसाठी नियम आहेत. ते किचकट असल्यामुळे लग्नसमारंभ असलेल्यांना सर्व कामे सोडून अडीच लाख रुपयांसाठी असलेल्या नियमांचे पालन करावे लागत आहेत. तसेच नातेवाईकांकडून हजार-हजार रुपये जमा करून खर्च भागविण्याची वेळ लग्न घरावर आली आहे. 

""बॅंकेने पैसे न दिल्याने अडचणी आल्या आहेत. त्यामुळे नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून लग्नसमारंभासाठी उसनवारी करीत आहेत. गावातील जेवणाच्या कार्यक्रमासाठी, तसेच वाहन इतर साहित्यासाठी जमेल तसे प्रयत्न करून उधारीवर चालविण्यासाठी आम्हाला खटटोप करावी लागत आहे. -किरण पाटील 

""रिझर्व्ह बॅंकेतर्फे ग्राहकांच्या मागणीच्या तुलनेत पैसे देण्यात येत नाहीत. आमच्या औरंगाबाद शहर आणि परिसरात बॅंकेच्या 21 शाखा आहेत. या शाखेतील ग्राहकांसाठी नियमितपणे पैसा पुरविण्यासाठी कोणीही नाराज होऊ नयेत यासाठी प्रयत्न करावे लागतात. रिझर्व्ह बॅंकेतून जसे पैसे येत आहेत, ते समपातळीवर ग्राहकांपर्यंत आम्ही पोचवत आहेत. 
-प्रवीण नांदेडकर, उपमुख्य अधिकारी, देवगिरी बॅंक