पूल पाण्याखाली गेल्याने बार्शीत वाहतूक विस्कळित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 जून 2017

बार्शी - मागील काही दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने गुरुवारी (ता.15) रात्रभर तालुक्‍यात सर्वदूर हजेरी लावली. रात्री उशिरा सुरू झालेला पाऊस शुक्रवारी पहाटेपर्यंत बरसत होता. या पावसामुळे नागझरी नदीला पूर आल्याने राळेरास (ता. बार्शी) येथे पुलावर पाणी आले. यामुळे बार्शी-सोलापूर रस्ता मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद होता. तसेच बार्शी शहराच्या पूर्व दिशेने उत्तर-दक्षिण वाहणाऱ्या घोर ओढ्याला पाणी आल्याने बार्शी-भूम, बार्शी-लातूर, बार्शी-उस्मानाबाद, तुळजापूर हे मराठवाड्याला जोडणारे बहुतांशी रस्ते सकाळपर्यंत बंद होते. सकाळी हळूहळू पुराचे पाणी ओसरल्यानंतर सर्वच रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत झाली.

राळेरास येथे नागझरी नदीवर दर वर्षी पूर येत असल्यामुळे येथे पूल मंजूर करण्यात आला आहे; पण दोन वर्षांपासून या पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे. कोकणातील महाड येथे सावित्री नदीवर मागील वर्षी झालेल्या दुर्घटनेनंतर अवघ्या 165 दिवसांत नवीन मोठा पूल उभा करण्यात आला आहे. तर बार्शीत नागझरी नदीवरील छोटाशा पुलाचे काम मागील दोन वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू आहे. यामुळे बांधकाम विभागाच्या कार्यावर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. नवीन पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी रस्ता करण्यात आला आहे. शुक्रवारी आलेल्या पुरामुळे हा पर्यायी रस्ता खचला असून यामुळे या मार्गावर धोका निर्माण झाला आहे.

बार्शी शहर व तालुक्‍यात मागील आठ दिवसांपासून मृग नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. पावसास दमदार सुरवात झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी करत बियाणे, खत घेण्यासाठी बाजारात गर्दी केल्याचे चित्र आहे. लवकरात लवकर पेरणी करण्यासाठी शेतकरी वापसा होण्याची वाट पाहत आहेत.