भंगार गोदामाच्या आगीत निकामी बॅटऱ्यांचे स्फोट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 एप्रिल 2017

औरंगाबाद - भंगार साहित्याच्या गोदामाला आग लागली. यामुळे परिसरातील भंगार वाहनांच्या बॅटऱ्यांचे स्फोट झाले. ही घटना शुक्रवारी (ता. 14) दुपारी पिसादेवी रस्त्यावरील आरतीनगर येथे घडली. त्यामुळे पिसादेवी परिसरात काहीवेळ भीतीचे वातावरण होते. आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

पिसादेवी रस्त्यावरील राठी कॉम्प्लेक्‍सलगत भंगारचे गोदाम आहे. या गोदामाला दुपारी दोनच्या सुमारास आग लागली. आगीत भंगारचे साहित्य वेढले गेले. प्लास्टिकच्या कॅरीबॅग, प्लास्टिकच्या बाटल्यांनी तसेच निकामी बॅटऱ्यांनी पेट घेतला. आग वाढत गेल्यानंतर धुराचे लोळ हवेत पसरले. दरम्यान, आगीची बाब तेथील कामगारांनी अग्निशमन विभागाला कळवली. घटनास्थळी सिडको अग्निशमन विभागाचे एस. के. भगत, वैभव बागडे, एस. ई. भोसले, अशोक वेलदोडे, अशोक वाघ यांनी चिकलठाणा अग्निशमन दलाच्या दोन बंबांसह धाव घेतली. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवून त्यांनी टॅंकरद्वारे तासात आग आटोक्‍यात आणली.

आग आटोक्‍यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच वाहनांच्या निकामी बॅटऱ्यांचे पाठोपाठ स्फोट झाले. त्यामुळे परिसरातील नागरिकांत घबराट निर्माण झाली. आगीत आठपेक्षा जास्त हातगाड्या, पाण्याची टाकी, भंगार साहित्य जळाले. लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यातच असून विभागाचे पथक तपास करीत आहे.