शेकडो वर्षांच्या औषधी यात्रेला अंधश्रद्धेचे ग्रहण!

latur
latur

लातूर : तेलंगणाच्या आदिलाबाद येथून सलग बावीस वर्षे या यात्रेत येऊन औषधी वनस्पतींचे सेवन करणाऱया शंकरा रेड्डी यांनी आजार बरा झाल्याचा अनुभव घेतला आहे, पण या यात्रा काळात लाखो लोक दिसेल त्या वनस्पतींचे पाने ओरबाडून खातात, तोडून नेण्याचा प्रयत्न करतात, फांद्या तोडल्या जातात, कंद खंदतात, छोट्या छोट्या वनस्पतींच्या साली काढतात, प्लॅस्टिक कचरा फेकतात, त्यामुळे यात्रेनंतर संजीवनी बेटाला एक प्रकारचा ओसाडपणा येतो. माहितीअभावी निर्माण झालेल्या अंधश्रद्धेतून हे नकळत घडते. 

लातूरपासून पुर्वेकडे तीस किलोमीटर दूर वडवळ येथे एकूण 25 हेक्टरपेक्षा अधिक परिसर असलेले हे औषधी संजीवनी बेट आहे. येथील मातीत लोहाचे प्रमाण अधिक असून तेथील खडकाचे कोकणातील जांभ्या खडकाशी साधर्म्य आढळते. येथे शुद्ध मुलतान मातीचे खडेही आढळतात. बेटातील खडकात लांबलचक गुहाही आढळतात. तेथे एका ठिकाणी चुंबकीय गुरुत्वाचे प्रमाण अधिक असल्याने तेथे माणूस घरंगळत वेगाने पुढे जातो. लोटांगणाची जागा म्हणून तेथे अनेक भाविक पूजाअर्चा करताना दिसतात. 

दीड हजारांपेक्षा अधिक वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचे अस्तित्व असलेल्या या बेटावर सूर्याचा उत्तरा नक्षत्रात प्रवेश होतो, त्या काळात औषधी यात्रा भरते. येथे हैदराबाद, तेलंगना, नागपूर, सांगोला, सोलापूर अशा दूरदूर परिसरातून दरवर्षी सुमारे दोन लाख रुग्ण, वैदु आणि आयुर्वेदिक तज्ज्ञ येतात. तीन दिवस बेटावरच झोपडीत राहून दिवसभर केवळ वनस्पतींचे पाने सेवन करतात. जोडीला येथे जवळच असलेल्या कुंडातील पाण्यात काळ्या साळीचे तांदूळ शिजवून भात खातात. तीन दिवसाच्या या अनोख्या भक्तीनंतर अनेकांना गुडघे दुखी, सांधेदुखी, पित्त, आकड्या, फिट, झटके अशा अनेक आजारातून बरे झाल्याचा अनुभव आहे. मात्र यावर अजूनही संशोधन झालेले नाही. येथील अनेक वन्स्पतींना कारे, लोखंडी, भिंगरी, वटवटी, टनटनी अशा स्थानिक नावाने ओळखले जाते. येथील वनस्पतींचा शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास झाल्यास, आणि कोणती वनस्पती कशासाठी उपयोगी आहे, याची माहिती येथे येणाऱयांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न झाल्यास संजीवनी बेटावरील जैववैविध्य जपले जाईल. साडेतीनशे माहिती असलेल्या वनस्पती आणि दीडशेपेक्षा अधिक कोणालाच माहिती नसलेल्या वनस्पतींची नोंद आहे. दोन-तीन वर्षांपूर्वी औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी येथील माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला होता, पण तोही तोडकाच, अशी खंत डॉ. संतोष बस्तापुरे यांनी 'सकाळ'कडे व्यक्त केले. 

गेल्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेदरम्यान येऊन येथील संशोधनाला चालणा देण्याबाबत आश्वासन देऊन गेले. मात्र  त्यात पुढे काहीच झाले नाही. गेली साठ वर्षे या यात्रेत काही काढे आणि औषधे तयार करून विक्रीस ठेवणारे 84 वर्षांचे गंगाधर जाधव म्हणाले, ''यंदा यात्रा जरा कमीच भरली. मला लई माहित नाही, पण माझ्या गुरुनं सांगितल्यापरमाणं मी थोड्याच झाडपाल्याचे चुर्ण, मुळ्या, काढा तयार करून विक्रीस ठेवतो. माझ्याकडेच्या औषधानं मिरगी, आकड्या, उलटी, त्वचेवरील गाठी कमी होतात. या आमच्या बेटावर जे भेटतं ते कुठंच सापड नाही, पण ह्याच्याकडे सध्या कोण बघना गेलय. ही टिकलं तरच जिंदगी टिकणार हाय.''

हे बेट आता वनविभागाच्या अखत्यारित आहे. येथे यात्राकाळाशिवाय इतर वेळी कोणालाही बेटावर जाण्याची परवानगी दिली जात नाही. तसेच आता झाडे तोडू किंवा फांद्या तोडू दिली जात नाहीत. पण वनविभागाच्या काही अधिकाऱयांनी या दुर्मिळ ठेवा असलेल्या बेटावर सागवान, गुलमोहर अशा वृक्षांची लागवड केली आहे. 13 सप्टेंबरला सुरु झालेल्या या औषधी यात्रेची सांगता आता गुरुवारी (ता. 27) सांगता होत आहे. त्यानंतर या मराठवाड्यातील अनोख्या यात्रेकडे सर्वांचे लक्ष पुढील वर्षी उत्तरा नक्षत्र सुरु झाल्यावरच जाणार. तोपर्येंत जैसे थे! 

अत्यंत दुर्मिळ ठेवा
मराठवाड्याच्या भूमित न सापडणाऱया अनेक वनस्पती या संजीवनी बेटावर आहेत. येथील मातीत लोहाचे प्रमाण अधिक आहे. येथे असलेला तेलकट जांभ्या खडक मराठवाड्यात इतरत्र सापडतो, याची मला माहिती नाही. पण हा जैववैविध्याचा अत्यंत दुर्मिळ ठेवा आपण जपला पाहिजे, हे नक्की.
- डॉ. संतोष बस्तापुरे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, जानवळ, जि. लातूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com