बीड बायपासला द्या सर्व्हिस रोड, नागरिकांची महापालिकेकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

औरंगाबाद - अतिक्रमणामुळे अरुंद झालेल्या बीड बायपासला सर्व्हिस रोड करण्याची मागणी मंगळवारी (ता. 4) स्थानिक रहिवाशांनी महापालिका आयुक्तांकडे केली.

औरंगाबाद - अतिक्रमणामुळे अरुंद झालेल्या बीड बायपासला सर्व्हिस रोड करण्याची मागणी मंगळवारी (ता. 4) स्थानिक रहिवाशांनी महापालिका आयुक्तांकडे केली.

बायपासने भरधाव वेगात धावणारी अवजड वाहने यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. पार्किंगची व्यवस्था नसलेली लॉन्स, मंगल कार्यालये यांमुळे या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्‍यक असून सर्व्हिस रोड तयार करणे गरजेचे असल्याचे आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

बीड बायपास हा मूळ आराखड्यात 200 फुटांचा होता. शिवाय सर्व्हिस रोडसाठी दोन्ही बाजूंनी प्रत्येकी 30 फूट जागा सोडण्यात आली होती; मात्र प्रत्यक्षात हा रस्ता 100 फुटांचाच बनवण्यात आला. उर्वरित रिकाम्या जागेवर भूमी माफियांनी कब्जा केल्याने बायपास अतिक्रमणांच्या विळख्यात असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. या मागण्यांची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करून संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन प्रत्यक्ष कामाला सुरवात करावी, तसेच या कामी चालढकल करणाऱ्या दोषींवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत. अन्यथा स्थानिक नागरिक, विद्यार्थी लोकशाही मार्गाने आंदोलन करतील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या मागण्यांची प्रत जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांनाही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: beed bypass service road demand