बीडमध्ये कडकडीत बंद, निषेध

बीडमध्ये कडकडीत बंद, निषेध

कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा तीव्र निषेध - आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

बीड - कोपर्डी (ता. कर्जत, जि. नगर) येथील अल्पवयीन मुलीवरील अमानुष अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ सोमवारी (ता.१८) बीडसह संपूर्ण जिल्हाभरात सर्वपक्षीय संघटना, कार्यकर्ते, व्यापाऱ्यांतर्फे कडकडीत बंद पाळण्यात आला. समाजातील सर्वच स्तरांतून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्हा बंदची हाक दिली होती. यानुसार सकाळपासूनच सर्व बाजारपेठा बंद होत्या. बीडमध्ये सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढली. शासकीय विश्रामगृहापासून निघालेली ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, कारंजा रोड, धोंडीपुरा, माळीवेस, सुभाष रोड, साठे चौक, जालना रोड, नगर रोडमार्गे दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. ‘आरोपीला फाशी झालीच पाहिजे’, ‘आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे’ अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. या वेळी काँग्रेसचे अशोक हिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख सचिन मुळूक, गंगाधर काळकुटे, भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील गलधर, ॲड. शेख शफिक, युक्रांदचे जिल्हाप्रमुख प्रा. पंडित तुपे, शिवसंग्रामचे अनिल घुमरे, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे,×ॲड. महेश धांडे, किशोर पिंगळे, सुमित नलावडे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, कार्याध्यक्ष राहुल वायकर, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक ठाकरे, मराठा सेवा संघाचे सचिव धनंजय शेंडगे, ज्ञानेश्‍वर काशीद, सागर बहीर, पिंपळवाडीचे सरपंच युवराज बहीरवाळ, शरद चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते, नागरिक, तरुणवर्ग मोठ्या संख्येने निषेध रॅलीत सहभागी झाले. यावेळी सर्वपक्षीय शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना निवेदन देण्यात आले. 

जलदगती न्यायालयात खटला चालवा 

दिल्ली येथील निर्भया प्रकरणाचा खटला जसा जलदगती न्यायालयात चालवून आरोपींना शिक्षा देण्यात आली त्याच धर्तीवर कोपर्डी खटला जलदगती न्यायालयात चालवून चारही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी यावेळी अशोक हिंगे, सचिन मुळूक, ॲड.महेश धांडे, स्वप्नील गलधर, सचिन उबाळे, हेमा पिंपळे, कुंदा काळे व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली.

महिलांचा बांगड्या फोडून निषेध

सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर येण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा हेमा पिंपळे, काँग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कुंदा काळे, जिजाऊ ब्रिगेडच्या कमल निंबाळकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांगड्या फोडून आरोपींना फाशी झालीच पाहिजे, अशी घोषणाबाजी करीत या प्रकरणाचा निषेध केला. 

व्यापाऱ्यांचा बंदला प्रतिसाद

जिल्हा बंदला बीडसह जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. बीडमधील सर्वच भागांतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. शहरात केवळ रुग्णालये व मेडिकलशिवाय कोणतेही दुकान सुरू नव्हते. बंदमुळे कायम वर्दळ असलेल्या सुभाष रोड व जालना रोडवर शुकशुकाट दिसून आला. 

शिक्षण संस्थांचा बंदला पाठिंबा

कोपर्डी प्रकरणाच्या निषेधार्थ जिल्हा बंदच्या आवाहनाला महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था मंडळ शाखा बीडतर्फे मंडळाचे जिल्हाध्यक्ष दीपक घुमरे यांनी पाठिंबा दिला होता. त्यानुसार शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बहुतांश शैक्षणिक संस्थांनी कडकडीत बंद पाळला. अनेक शाळांत पीडित मुलीस श्रद्धांजली वाहण्यात आली.

कड्यात कडकडीत बंद 

कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता.१८) कडकडीत बंद पाळण्यात आला. या वेळी शहरातील सर्व दुकाने, हॉटेल्स, पानटपऱ्या, शाळा, महाविद्यालये संपूर्ण दिवसभर बंद होती. सकाळी सर्व व्यापाऱ्यांनी  स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने बंद ठेवल्याने दिवसभर शुकशुकाट होता. पक्षीय कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध नोंदवीत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल ढोबळे, शिवसेनेचे शिंदे, रासपचे डॉ. शेंडगे, गंगा खेडकर, भाजपचे रवींद्र ढोबळे, अनेक सामजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या बंदचे आवाहन केले होते. बंददरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.

पाटोद्यातही कडकडीत बंद 

कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (ता.१८) शहरासह तालुक्‍यात कडकडीत बंद पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली. या वेळी सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार मुकेश कांबळे यांना निवेदन देऊन या घटनेतील आरोपीस कठोर शिक्षा द्यावी. खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली. या वेळी जिल्हा परिषदेचे सभापती महेंद्र गर्जे, बालाघाटचे विष्णुपंत घोलप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय नवले, नगरसेवक राजू जाधव, नारायण क्षीरसागर यांच्यासह नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

गेवराई तालुक्‍यात बंद

कोपर्डी (ता. कर्जत) येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या जिल्हा बंदला सोमवारी (ता.१८) शहरासह तालुक्‍यात प्रतिसाद मिळाला. शहरासह तालुक्‍यातील मादळमोही, कोळगाव, तलवाडा, जातेगाव, उमापूर, सिरसदेवी, गढी, पाडळसिंगी आदी ठिकाणी सर्व दुकाने,  खासगी  शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. शहरातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. शहरात काढलेल्या मूकमोर्चात सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. शहरातील शाळेत विद्यार्थी गेल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले.  या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सर्वपक्षीय पदाधिकारी, संघटनांतर्फे नायब तहसीलदार वैजनाथ जोशी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

बीडमध्ये दोन बसवर दगडफेक

कोपर्डी (ता. कर्जत) घटनेच्या निषेधार्थ रविवारी (ता.१७) रात्री अकराच्या सुमारास दहा जणांनी शहरातील बार्शी नाका परिसरात दोन बसवर दगडफेक केली. तालुक्‍यातील मैंदा पाटी येथे एका बसवर सोमवारी (ता.१८) दगडफेक केली. या प्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बार्शी नाका भागात रविवारी रात्री अकराच्या सुमारास औरंगाबाद-सोलापूर बस क्र.(एमएच- ४० एन- ९६४०), पंढरपूर-बीड बस क्र.(एमएच- १४ बीटी- २१८४) या दोन गाड्यांवर राजेंद्र आमटे, गणेश मोरे, दादा फुंडकर, योगेश शेळके व इतर अशा दहा जणांनी दगडफेक करून काचा फोडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. बीड तालुक्‍यातील मैंदा पाटी येथेही काहींनी बीड-धारूर बसवर क्र. (एमएच- २० बीएल- ०१२५) सोमवारी (ता.१८) दुपारी दगडफेक केली. या प्रकरणी पेठबीड ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com