'विकास' येरवड्यात अन्‌ जय शहालाच 'अच्छे दिन' - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

बीड - नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत केलेली भाषणे लोक विसरलेले नाहीत. "सबका साथ सबका विकास', "अच्छे दिन'ची खोटी स्वप्ने दाखवून त्यांनी सत्ता मिळवली. "विकास' येरवड्याच्या रुग्णालयात आणि जय अमित शहा यांनाच "अच्छे दिन' आल्याचा टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लगावला. ज्या सरकारला लोकांनी डोक्‍यावर घेतले त्याला पायाखाली घेण्याची मानसिकता लोकांमध्ये आहे. लोक रुमणे घेऊन या सरकारच्या मागे लागतील, असेही मुंडे म्हणाले. केंद्र, राज्य सरकारसह पंकजा मुंडे यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले.

पक्षाचे नेते प्रकाश सोळंके, अमरसिंह पंडित यांनीही सरकारच्या धोरणांवर या वेळी टीका केली. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, सुरळीत वीज पुरवठा, शेती मालाला हमी भाव, परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत आदी मागण्यांसाठी सोमवारी (ता. 23) राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे येथे धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून निघालेल्या मोर्चात ऊस लावलेल्या बैलगाडीतून नेते मंडळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आली. तेथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. त्यावेळी मुंडे म्हणाले की, "बहोत हो गयी महागाई की मार; अब की बार..!' अशा घोषणा देऊन मोदींनी सत्ता मिळवली. आता पेट्रोल 80 रुपये, डिझेल 70 रुपये प्रतिलिटर, तर गॅस सिलिंडर 400 वरून 800 रुपयांवर गेला आहे.

अडचणींचा विषय आला की ते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरत असल्याचा आरोपही मुंडेंनी केला.

पंकजा मुंडेंवर टीका
बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यावरही धनंजय मुंडे यांनी टीका केली. भगवान गडावर बोलण्यासाठी त्या वीस मिनीटे मागतात, रडतात. मग ऊसतोड मजुरांवर का बोलत नाहीत, असा टोला त्यांनी लगावला. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने महामंडळ काढले, पण एकालाही मदत मिळाली नाही. महामंडळाचे कार्यालयात सापडत नाही, अधिकारी सापडत नाहीत. हे चित्र पाहून लाज वाटायला पाहिजे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

प्रकाश सोळंके यांनी मोदींना "सपनो का सौदागर' अशी उपमा दिली. नोटाबंदीत तीनशे माणसे मेली पण काळा एक रुपयाही जमा झाला नाही. प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये येण्याचे काय झाले. निर्लज्ज आणि गेंड्याची कातडी पांघरलले सरकार असल्याचा टोला त्यांनी लगावला.

विरोधी पक्षात व प्रदेशाध्यक्ष असताना सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कापसाला साडेआठ हजार आणि सोयाबीनला साडेसात हजार रुपयांचा भाव देण्याची मागणी करीत राज्यात दिंड्या काढत होते. शिवसेनेवाले लाल दिव्याच्या गाडीत बसून आंदोलन करतात. मर्द असाल तर बाहेर पडा, असा टोला अमरसिंह पंडित यांनी शिवसेनेला लगावला.