नगराध्यक्षांच्या टेबल-खुर्चीवर टाकली घाण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

शहरातल्या अस्वच्छतेस जबाबदार असल्याचा आरोप; काकू-नाना आघाडीचे आंदोलन

बीड - स्वच्छता व विकासाच्या प्रश्‍नात नगराध्यक्ष अडथळा निर्माण करीत आहेत, शहरातील अस्वच्छतेला डॉ. भारतभूषण क्षीरसागरच जबाबदार असल्याचा आरोप करीत काकू-नाना आघाडीच्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. २७) नगराध्यक्षांच्या दालनात, तसेच त्यांच्या टेबल- खुर्चीवर गटारातील घाण टाकली. गोंधळ निर्माण झाल्यामुळे फौजफाट्यासह पोलिस दाखल झाले. 

शहरातल्या अस्वच्छतेस जबाबदार असल्याचा आरोप; काकू-नाना आघाडीचे आंदोलन

बीड - स्वच्छता व विकासाच्या प्रश्‍नात नगराध्यक्ष अडथळा निर्माण करीत आहेत, शहरातील अस्वच्छतेला डॉ. भारतभूषण क्षीरसागरच जबाबदार असल्याचा आरोप करीत काकू-नाना आघाडीच्या पालिकेतील पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. २७) नगराध्यक्षांच्या दालनात, तसेच त्यांच्या टेबल- खुर्चीवर गटारातील घाण टाकली. गोंधळ निर्माण झाल्यामुळे फौजफाट्यासह पोलिस दाखल झाले. 

नगरपालिकेत नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यामुळे सामान्यांची कामे खोळंबली असल्याचे काकू-नाना विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शहरातील स्वच्छतेसंदर्भात काकू-नाना विकास आघाडी व एमआयएम गटाच्या नगरसेवकांनी पाठपुरावा केला. विषय समितीच्या बैठकीत सर्वसाधारण सभेत विविध प्रश्‍न उपस्थित केले; परंतु नगराध्यक्षांनी या प्रश्‍नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत शहरातील जनतेला वेठीस धरल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. शहरातील गल्ल्यांमध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून घंटागाड्याही बंद आहेत. चालू वर्षात स्वच्छतेचे, भंडार विभागाचे, घंटागाड्यांचे टेंडर काढण्यास उशीर केल्याचा आरोपही करण्यात आला. यामुळे या प्रश्‍नावर उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या दालनात, तसेच टेबल खुर्चीवर घाण टाकून घोषणाबाजी केली. यापुढे नगराध्यक्षांकडून शहराच्या स्वच्छतेसाठी सहकार्य झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी दिला. या वेळी सभापती फारुक पटेल, सभापती अमर नाईकवाडे, बाळासाहेब गुंजाळ, युवराज जगताप, श्री. चव्हाण आदींसह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.

पालिका की छावणी?
पालिकेत पदाधिकारी निवडीदिवशीही मोठा पोलिस बंदोबस्त होता. त्यातच कर्मचाऱ्याला धमकी व मारहाणीचे प्रकार मधल्या काळात घडले. या वेळीही पालिकेभोवती पोलिसांचा मोठा फौजफाटा होता. मंगळवारी आघाडीने घाण टाकण्याच्या आंदोलनानंतरही पोलिस पालिकेत दाखल झाले. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस व्हॅन आणि दहा पोलिस कर्मचारी पालिकेत तळ ठोकून होते. त्यामुळे पालिका आहे की छावणी असा प्रश्‍न पडत आहे.

घाण पसरविणे हीच त्यांची संस्कृती - डॉ. क्षीरसागर
ज्यांच्याकडे स्वच्छतेचे काम आहे त्याच सभापतींनी घाण टाकणे ही पालिकेच्या इतिहासातील पहिली घटना आहे. आतापर्यंतचे ते सर्वांत निष्क्रिय सभापती आहेत, असे नगरसेवक डॉ. योगेश क्षीरसागर म्हणाले. नगराध्यक्षांच्या दालनात घाण टाकण्याच्या घटनेनंतर डॉ. क्षीरसागर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. घाण पसरवणे हीच आघाडीची संस्कृती असून त्यांनी मनातली घाण पालिकेत टाकली, असा टोलाही त्यांनी लगावला. स्वच्छतेच्या कंत्राटातून उपाध्यक्ष आणि सभापतींना पैसे खाण्याचा डाव हाणून पाडल्याने ही कृती केल्याचा आरोपही त्यांनी केला. आघाडीच्या या वृत्तीचा शहरवासीयांना आता अनुभव येत आहे. त्यांच्याकडे बहुमत आहे, ते कोणताही ठराव घेऊ शकतात. त्यांना स्वच्छता करता येत नसेल तर राजीनामे द्यावेत, आम्ही पालिका चालवून दाखवू, असे आव्हानही डॉ. योगेश क्षीरसागर यांनी दिले. नगरसेवक विनोद मुळूक, भीमराव वाघचौरे, गणेश वाघमारे, प्रेम चांदणे उपस्थित होते.