वीजप्रश्‍न सोडविण्यासाठी मेटेंचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

बीड - घरगुती, तसेच शेतीबाबतच्या वीजप्रश्‍नी आमदार विनायक मेटे यांनी लक्ष घातले आहे. याबाबत श्री. मेटे यांनी शनिवारी (ता. १५) महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात आढावा बैठक घेतली. 

बीड - घरगुती, तसेच शेतीबाबतच्या वीजप्रश्‍नी आमदार विनायक मेटे यांनी लक्ष घातले आहे. याबाबत श्री. मेटे यांनी शनिवारी (ता. १५) महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात आढावा बैठक घेतली. 

महावितरणच्या लातूर परिमंडळाचे मुख्य अभियंता आर. बी. बुरुड, अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे उपस्थित होते. या चार तासांच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या वीज जोडण्या, लोंबकळणाऱ्या वीज तारा, घरगुती जोडण्या, वाकलेले वीज खांब, जादा वीज बिल आदींबाबत मेटेंनी अधिकाऱ्यांवर प्रश्‍नांची सरबत्ती केली. या वेळी महावितरणच्या स्थानिक कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून अडवणूक झालेले शेतकरीही बैठकीत उपस्थित होते. जिल्ह्यातील नव्याने मंजूर असलेल्या व कामे सुरू असलेल्या १३२ केव्हीए, ३३ केव्हीए वीज केंद्रांच्या कामांच्या प्रगतीची माहिती घेऊन ही कामे त्वरित सुरू करण्याच्या सूचना दिल्या. 

चौसाळा, मुळूक, समनापूर, नागऱ्याचीवाडी, खापरपांगरी, वरवटी, माळेवाडी, वाडवाना, मानेवाडी, पिंपळगाव, रुईगव्हाण, हिगणी खुर्द, कोल्हारवाडी, खर्ड्याचीवाडी, माळापुरी, धावज्याची वाडी, पालवण, तळेगाव, पोखरी, वडगाव गुंधा या गावातील वीजप्रश्‍न सोडवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, शेतकऱ्यांना थकीत वीज बिल भरण्याचे आवाहन केले.

महावितरणच्या विविध कामांसाठी जिल्हा नियोजन समितीतून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यामार्फत निधी उपलब्ध करून देण्याबरोबर इतर मोठ्या प्रश्‍नांसाठी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेण्याचे आश्‍वासही त्यांनी दिले. गेवराईच्या सहारा अनाथालयाला वीज जोडणीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी देणार असल्याचेही मेटे म्हणाले. या वेळी इन्फंट इंडिया संस्थेच्या वीज जोडणीबाबतही मेटेंनी सूचना दिल्या.

या वेळी शिवसंग्रामचे युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा, अनिल घुमरे, सोमनाथ माने, ज्ञानेश्‍वर कोकाटे, कैलास माने, मनोज जाधव उपस्थित होते.