ऑनलाईन विमा अन्‌ यंत्रणा ऑफलाईन

दत्ता देशमुख
गुरुवार, 27 जुलै 2017

केवळ ३० हजार शेतकऱ्यांनी भरला विमा; चार दिवस शिल्लक राहिले तरी वेबसाईट अपडेट होईना

बीड - देशभरात लागू झालेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने विमा हप्ता भरायचा खरा पण त्यासाठी यंत्रणा तोकडी असल्याने शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे.

दरवर्षी साधारण नऊ लाख खातेदार पीक विमा भरत असताना यंदा आतापर्यंत केवळ ३० हजार शेतकऱ्यांनाच विमा भरता आला आहे. विशेष म्हणजे यासाठी असणारी वेबसाईट अद्याप अपडेट झालेली नाही. 

केवळ ३० हजार शेतकऱ्यांनी भरला विमा; चार दिवस शिल्लक राहिले तरी वेबसाईट अपडेट होईना

बीड - देशभरात लागू झालेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने विमा हप्ता भरायचा खरा पण त्यासाठी यंत्रणा तोकडी असल्याने शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्‍यता आहे.

दरवर्षी साधारण नऊ लाख खातेदार पीक विमा भरत असताना यंदा आतापर्यंत केवळ ३० हजार शेतकऱ्यांनाच विमा भरता आला आहे. विशेष म्हणजे यासाठी असणारी वेबसाईट अद्याप अपडेट झालेली नाही. 

जिल्ह्यात सहा लाख ५१ हजार शेतकरी असून दरवर्षी साधारण नऊ लाख खात्यांवर पीक विमा भरल्याची नोंद होते. एका शेतकऱ्याने वेगवेगळ्या पिकांसाठी विमा भरल्याने त्याच्या तेवढ्या नोंदी झाल्याने हा आकडा वाढतो. यंदा प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरु झाली असून तो ऑनलाईन भरायचा आहे. मात्र, हीच खरी मेख ठरल्याने आतापर्यंत केवळ ३० हजार खात्यांचाच विमा हप्ता भरता आला आहे. ३१ जुलै ही विमा भरण्याची शेवटची मुदत आहे. 

आता ऑफलाईन विमा घेण्याबाबत वरिष्ठांनी बॅंकांना सूचना दिल्या असल्या, तरी या वेबसाईटचे ऑफलाईन सर्व्हरदेखील अद्याप एकाही बॅंकेत डाऊनलोड झालेले नाही. तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांना आपले सरकार आणि महा-ई-सेवा केंद्रातून हा विमा भरायचा आहे. या केंद्रांवर वर सुविधा असून, त्यासाठी शासन केंद्रांना प्रतिशेतकरी २४ रुपये अदा करणार आहेत; मात्र, बहुतेक केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडून शंभर रुपयांपासून २५० रुपयांपर्यंत रक्कम घ्यायला सुरवात केली आहे. 

अग्रक्रमांची कामे एकाच वेळी
सध्या पीक कर्जांचे नवे-जुने, नवीन कर्जवाटप, शेतकऱ्यांना दहा हजारांची तातडीचे कर्ज आणि विमा भरून घेण्याची संपत आलेली मुदत अशी अग्रक्रमांची सर्वच कामे बॅंकांभोवती एकाच वेळी आली आहेत. सर्वच कामांबाबत शासनाचे सक्तीचे आदेश आहेत. मात्र, बॅंकांमधील अपुरे मनुष्यबळ, खेड्यांमध्ये खंडित वीजपुरवठा, यंत्रणांचा अभाव अशा अडचणींचा सामना बॅंकांना करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रोषही अधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. जिल्हा बॅंकेने अद्याप विमा भरून घेण्यास सुरवातही केलेली नसल्याने इतर बॅंकांचे काम वाढले आहे. 

मुदत वाढली नाही तर शेतकरी राहणार वंचित
दरम्यान, पीकविमा भरण्याची शेवटची मुदत ३१ जुलै आहे. ऑनलाईन विमा भरून घेण्यासाठी करण्याचा सोपस्कर आणि इतर कामे करताना बॅंकांच्या नाकीनऊ येत असल्याने आता ऑफलाईन भरून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत; पण बॅंकांनी ऑफलाईन विमा भरून घेतला तरी शेतकऱ्यांची सर्व माहिती आणि सर्व कागदपत्रे स्कॅन करून नऊ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करायची आहेत. तरच युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी विमा क्‍लेम ग्राह्य धरणार आहे. मधल्या वेळेत बॅंकेतील इतर कामे करताना एवढा सोपस्कर झाला नाही तर अशी शेतकऱ्यांच्या विम्याला जबाबदार कोण, अशी भीती बॅंकांना वाटत आहे. त्यामुळे बॅंकांनीही विमा स्वीकारण्यास नकारघंटा वाजविली आहे. त्यामुळे शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहण्याची भीती आहे.

बॅंकांकडे यंत्रणा तोकडी
जिल्ह्यात १३१२ महा-ई-सेवा केंद्र आणि विविध बॅंकांच्या २०३ शाखा आहेत. पीक विमा भरण्यासाठी सर्व कागदपत्रे स्कॅन करुन www.agri-in.insurance.gov.com या वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत. विशेष म्हणजे एका खातेदाराचा विमा भरुन घेताना या वेबसाईटवर संबंधित खातेदाराची २७ कॉलममध्ये माहिती भरुन घ्यायची आहे. यामध्ये शेतकऱ्याचा आधार क्रमांक, खाते क्रमांक, फोटो, गट, पेरा, पीकवारी, मोबाईल क्रमांक, कोड नंबर या बाबींचा समावेश आहे. त्यासाठी लागणाऱ्या वेळेचा विचार करता एका शेतकऱ्यासाठी किमान अर्ध्या तासाचा वेळ आवश्‍यक आहे. त्यातही अनेक बॅंकांच्या शाखांमध्ये प्रिंटर, स्कॅनर, थंब मशिन या सुविधाच नाहीत.

Web Title: beed marathwada news online insurance & system offline