बीडमध्ये मोरयाच्या गजरात गणरायाचे आगमन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 सप्टेंबर 2016

बीड - ढोल-ताशांचा नाद अन्‌ मोरयाच्या गजरात सोमवारी (ता.५) गणराय घरोघरी विराजमान झाले. जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, ‘बाप्पा मोरया’च्या गजरात जिल्हाभरात गणेश मंडळांनी, तसेच घरोघरी गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. शहरात सकाळपासूनच गणरायाच्या आगमनाची तयारी दिसून आली. गणेशमूर्ती घेण्यासाठी आलेल्या मंडळांनी काढलेल्या मिरवणुकीतील ढोल-ताशांचा गजर अन्‌ गणपतीच्या जयजयकाराने सिद्धिविनायक संकुल परिसर दणाणून गेला.

बीड - ढोल-ताशांचा नाद अन्‌ मोरयाच्या गजरात सोमवारी (ता.५) गणराय घरोघरी विराजमान झाले. जिल्ह्यात गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून, ‘बाप्पा मोरया’च्या गजरात जिल्हाभरात गणेश मंडळांनी, तसेच घरोघरी गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली. शहरात सकाळपासूनच गणरायाच्या आगमनाची तयारी दिसून आली. गणेशमूर्ती घेण्यासाठी आलेल्या मंडळांनी काढलेल्या मिरवणुकीतील ढोल-ताशांचा गजर अन्‌ गणपतीच्या जयजयकाराने सिद्धिविनायक संकुल परिसर दणाणून गेला.

गेल्या अनेक दिवसांपासून गणरायाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या गणेशभक्‍तांनी सोमवारी (ता.५) सकाळपासून बाजारात गर्दी केली होती. गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी शहरातील सिद्धिविनायक संकुल सकाळपासूनच गजबजून गेले होते. गणेशमूर्तीसह पूजेचे साहित्य खरेदीसाठी आबालवृद्धांची लगबग सुरू होती. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शांतता असलेल्या बाजारपेठा ग्राहकांच्या वर्दळीने गजबजून गेल्या होत्या. दुपारपासून गर्दी वाढतच गेली. 

बीड शहरासह गेवराई, शिरूर, वडवणी, माजलगाव, पाटोदा तालुक्‍यातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी गर्दी केल्याने सिद्धिविनायक संकुल परिसरातील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.

गणेश स्थापनेची सुटी असल्याने बच्चेकंपनींचीही मोठी गर्दी दिसून आली. ग्रामीण भागातून अनेक गणेश मंडळे मूर्तीच्या खरेदीसाठी रिक्षा तसेच पिकअप वाहने घेऊन शहरात दाखल झाली होती. गणेश मंडळांनी गणेशमूर्तीच्या खरेदीनंतर ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करीत मिरवणुका काढल्याने आबालवृद्धांच्या उत्साहाला उधाण आले होते. गणरायाच्या स्थापनेपासून विसर्जनापर्यंत आता दहा दिवस हा उत्साह टिकून राहणार असल्याच्या प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्या. जिल्ह्यात गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती होती. यावर्षी आत्तापर्यंत चांगला पाऊस झाल्याने व किडीचा प्रादुर्भाव वगळता पिकांची परिस्थिती बऱ्यापैकी असल्याने गणेश उत्सवाबाबत शहरात व खेडोपाडी गणेशभक्तांमध्ये उत्साह आहे.

सिद्धिविनायक संकुलात गणेशमूर्ती विक्रीसाठी ७० स्टॉल उभारण्यात आले होते. विविध रूपातील आकर्षक गणेशमूर्ती उपलब्ध असल्याने भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. समाधानकारक पावसामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा अधिक उत्साह दिसून आला तरी गणेशमूर्तींच्या दरात यावर्षी २५ टक्के वाढ झाल्याने भाविकांना यंदा मूर्तीसाठी जादा पैसे मोजावे लागले. दिवसभरात मूर्ती व्यापाऱ्यांची मोठी उलाढाल झाली.

महाप्रसादासाठी परवानगी आवश्‍यक

गणेशोत्सवात अन्नदानाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र गत महिन्यात वांगी (ता. बीड) येथे महाप्रसादातून शेकडो जणांना विषबाधा झाल्याने या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने गणेश मंडळांना महाप्रसाद वाटपासाठी आता अन्न व औषधी प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. या निर्णयाचे गणेशभक्तांमधूनही स्वागत होत आहे.