आधार सिडिंगमधील चुकांमुळे ई-पॉसच्या धान्यवाटपात अडचणी

आधार सिडिंगमधील चुकांमुळे ई-पॉसच्या धान्यवाटपात अडचणी

बीड - रेशनचे धान्य ई-पॉस यंत्रणेमार्फत वाटप करण्याचे शासनाचे धोरण असले तरी आधार सिडिंगमधील चुका अन्‌ वितरण व्यवस्थेत ऑनलाइन केलेल्या माहितीतील चुकांमुळे ई-पॉस यंत्रणेतून शंभर टक्के धान्य वाटप करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे आता नव्याने आधारमधील चुका दुरुस्त करायच्या आणि त्यानुसार वितरण व्यवस्थेची माहिती ऑनलाइन करण्याची वेळ पुरवठा विभागावर आली आहे.

रेशनच्या धान्य वितरणातील गळती थांबविण्यासाठी ई-पॉस यंत्रणा राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला. बीड जिल्ह्यापासून श्रीगणेशा झालेल्या या ई-पॉस यंत्रणेसाठी आधारच्या यंत्रणेकडून मिळालेल्या नोंदी प्रमाण मानल्या गेल्या आहेत. जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना ज्या ई-पॉस मशीन दिल्या गेल्या त्याची प्रोग्रामिंग आधारवरील माहितीच्या आधारे आहे. त्या माहितीच्या आधारे आधार क्रमांकानुसार अंगठ्याचे ठसे जुळतात का? हे पाहायचे आणि त्यानुसार धान्य वाटप करायचे ही पध्दत आहे. मात्र प्रत्यक्षात या अंमलबजावणीत मोठ्या प्रमाणावर अडचणी उद्‌भवत आहेत.

आधार कार्ड तयार करताना अनेकांच्या नावात इंग्रजी स्पेलिंगमध्ये चुका झालेल्या आहेत, तर काही नावांमध्ये मुळाक्षरांसोबतच चिन्हे पडलेली आहेत. आधार कार्ड तयार करताना त्या यंत्रणेतील व्यक्तींकडून या चुका झाल्या. मात्र आता ई-पॉस मशीनमध्ये त्याच स्वरूपातील माहिती आहे. दुसरीकडे शिधापत्रिकांचे संगणकीकरण करताना पुरवठा विभागाने २०१० पासून वेगवेगळ्या एजन्सीकडून हे काम करून घेतले आहे. ही माहिती भरतानाही अनेकदा नावाच्या स्पेलिंगमध्ये चुका झालेल्या आहेत. अनेकदा आधार कार्डावरील नाव आणि शिधापत्रिकेवरील नाव यांच्या स्पेलिंगमध्ये तफावत येऊ लागली आहे. त्यामुळे ई-पॉसमधील माहिती शिधापत्रिकाधारकांच्या माहितीशी जुळत नाही. पर्यायाने नॉट व्हेरिफाईड या वर्गीकरणाखाली आता संबंधितांना धान्य वाटप करावे लागत आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी कमी-अधिक फरकाने हेच चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे पुरवठा विभागाचे काम सोपे होण्याऐवजी ते किचकट होत असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com