झाली दिन दिन दिवाळी; गाडी फडाकडं निघाली

पांडुरंग उगले
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

माजलगाव - यावर्षी साखर कारखान्याचा लांबलेला ऊस गाळप हंगाम, समाधानकारक पाऊस आणि ऑक्‍टोबर महिन्याच्या मध्यालाच आलेली दिवाळी, यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी यावर्षी कुटुंबासोबत घरीच दिवाळी साजरी केली. आता कोयत्याला धार लावून, तोडकामोडका संसार पाठीवर घेत मजुरांची उसाच्या फडावर जायची लगबग गावागावात सुरु झाली आहे.

माजलगाव - यावर्षी साखर कारखान्याचा लांबलेला ऊस गाळप हंगाम, समाधानकारक पाऊस आणि ऑक्‍टोबर महिन्याच्या मध्यालाच आलेली दिवाळी, यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी यावर्षी कुटुंबासोबत घरीच दिवाळी साजरी केली. आता कोयत्याला धार लावून, तोडकामोडका संसार पाठीवर घेत मजुरांची उसाच्या फडावर जायची लगबग गावागावात सुरु झाली आहे.

ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातून दरवर्षी जवळपास सहा लाख मजूर पश्‍चिम महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात जातात. दरवर्षी दसऱ्यानंतर कुटुंबीयांसह मजूर साखर कारखान्याकडे स्थलांतर करतात. दरवर्षी एकीकडे सर्वजण धूमधडाक्‍यात दिवाळी साजरी करीत असताना ऊसतोड मजुरांच्या नशिबी मात्र रोजचीच भाजीभाकरी. यावर्षी मात्र लांबलेला गळीत हंगाम आणि लवकर आलेली दिवाळी, यामुळे ऊसतोड मजुरांनी कुटुंबासोबत घरीच दिवाळी साजरी केली. मागील २१ वर्षात ऊसतोड मजुरांच्या आंदोलनामुळे १९९६ आणि २०१४ मध्ये अशी संधी मजुरांना मिळाली होती. चार दिवस सणाचा आनंद घेतल्यानंतर भाऊबीजेच्या दिवशीच मुकादमाच्या गाड्या ऊसतोड मजुरांच्या दारात लागल्या आहेत. खायला सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य, सरपण, फाटक्‍या-तुटक्‍या कपड्यांचे बोचके बांधून ऊसतोड मजुरांची उसाच्या फडावर जाण्यासाठी तयारी सुरू आहे. 

‘दिवाळीचे असे दिस झाले चार, लावू चला आता कोयत्याला धार...’ या कवी प्रभाकर साळेगावकरांच्या कवितेच्या ओळीचे चित्र सध्या खेड्यापाड्यात पाहायला मिळत आहे. आष्टी, पाटोदा, धारूर, केज, गेवराई, शिरूर कासार आदी तालुक्‍यांतून मोठ्या प्रमाणात ऊसतोड मजूर फडावर जात असल्याने उन्हाळ्यात गाव ओस पडल्याचे चित्र दिसून येते.

उचलीचा पैसा बाजारपेठेत
जून, जुलै महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले आहे. सोयाबीन, मूग, कापूस घरातच असल्याने बाजारपेठेवर परिणाम दिसून आला; परंतु यावर्षी मजुरांना मिळालेल्या उचलीचा पैसा बाजारपेठेत आला. अनेक गावचे अर्थकारण ऊसतोड मजुरांना मिळालेल्या उचलीवर (पैशांवर) अवलंबून आहे. मुकादमाकडून एका कोयत्याला (स्त्री, पुरुष) साठ ते सत्तर हजार रुपये उचल देण्यात आल्याने मोठ्या उत्साहात मजुरांनी दिवाळी साजरी केली आहे.

धारदार कोयत्याला नाही आधार
राज्यात दरवर्षी १२ हजार कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल होणाऱ्या साखर उद्योगाचा कणा असलेला ऊसतोड मजुरांच्या समस्येकडे कोणत्याच सरकारने लक्ष दिलेले नाही. रात्रंदिवस रक्ताचे पाणी करून करीत असलेल्या काबाडकष्टाचा अपेक्षित पैसा या मजुरांना मिळत नाही. आजही अनेक समस्यांनी तो ग्रस्त आहे. हक्काची व्होट बॅंक समजून अनेकांनी ऊसतोड मजुरांच्या जीवावर राजकारण केलेले नेते त्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहेत. यामुळे राज्यात कोट्यवधीची उलाढाल करणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या धारदार कोयत्याला मात्र अद्याप कोणाचाच आधार भेटलेला नाही.

दरवर्षी आम्ही दिवाळीचा सण उसाच्या फडातच साजरा करीत असतो. शाळेत जाणारी मुले घरी ठेवून आम्हाला कारखान्याला जावे लागते. यावर्षी मात्र कुटुंबातील लेकराबाळांसोबत आनंदाने दिवाळी साजरी केली.
- सखाराम कांबळे, ऊसतोड मजूर.