एक क्विंटल गांजा शिरूरमध्ये जप्त 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

बीड - हैदराबादहून शनिशिंगणापूरकडे वाहनातून जाणारा 107 किलो गांजा पोलिसांनी शिरूर येथील गोमळवाडा चौकात मंगळवारी पहाटे जप्त केला. या वेळी गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

बीड - हैदराबादहून शनिशिंगणापूरकडे वाहनातून जाणारा 107 किलो गांजा पोलिसांनी शिरूर येथील गोमळवाडा चौकात मंगळवारी पहाटे जप्त केला. या वेळी गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सोमवारी (ता.24) रात्री "ऑपरेशन ऑलआऊट' राबविण्यात आले. या वेळी शिरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस निरीक्षक टी. बी. दराडे यांनी गोमळवाडा चौकात नाकाबंदी केली होती. आज पहाटे भरधाव जाणारे चारचाकी वाहन थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला; परंतु चालकाने हुलकावणी दिली. पोलिसांनी तत्काळ पाठलाग करून हे वाहन अडविले. वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दोन लाख 19 हजार 400 रुपयांचा तब्बल एक क्विंटल सात किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह आठ लाख रुपये किमतीचे वाहन व एक मोबाईलही जप्त केला. या प्रकरणी शेख मुबारक शेख दगडू (25 रा. मढी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) व दिनकर त्रिंबक तुपे (48 रा. बह्मणपूर, ता. नेवासा, जि. अहमदनगर) या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरोधात शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांना न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी दिली.