मुदतवाढीची आशा अन्‌ शेतकऱ्यांची परवड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

बीड - पीकविमा भरण्याचा सुरवातीपासून सुरु असलेला घोळ मुदतवाढीनंतर आणखीच वाढला. शासनाच्या नवीन आदेशात एक दिवसाची मुदत कमी आणि बॅंकांना वगळल्याने शेतकऱ्यांचे हाल आणखीच वाढले आहेत. बॅंकांमध्ये विमा भरण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. केवळ सेवा केंद्रांतच विमा स्वीकारला जात असल्याने शेतकऱ्यांची पुन्हा एकदा लूट सुरु झाली. बॅंकांमधून विमा स्वीकारावा या मागणीसाठी केजमध्ये रास्ता रोको करण्यात आला. 

यंदा विमा ऑनलाईन भरायचा होता. शेवटी ऑफलाईन विमा स्वीकारण्याचे आदेश दिल्यानंतर बॅंकांमध्ये विमा स्वीकारला गेला पण सर्व घोळांत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहिले. दरम्यान, विमा भरुन घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी सर्व स्तरातून झाल्यानंतर सोमवारी (ता. ३१) रात्री उशिरा विमा भरण्यास मुदतवाढ देण्यात आली. मात्र, याचा निर्णय बॅंकांपर्यंत पोहचेपर्यंत बॅंकांचे कामकाज संपले.

पुन्हा बॅंकांना विमा भरण्यातून वगळून सेवा केंद्रांमध्ये विमा भरुन घेण्याचा नवीन निर्णय झाला. मुदतवाढ मिळाली या आशेने बुधवारी शेतकऱ्यांनी बॅंकांसमोर गर्दी केली. मात्र, विमा भरुन घेण्याचे आदेशच नसल्याने बॅंकांनी शेतकऱ्यांना नकार दिला. यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड तर झालाच शिवाय शेतकऱ्यांनी संतापही व्यक्त केला. 

केजमध्ये रास्ता रोको
बॅंकांमध्ये पीक विमा भरुन घ्यावा या मागणीसाठी केजमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. यावेळी शासनविरोधी घोषणाही देण्यात आला. रास्ता रोकोमुळे केज - बीड व केज - कळंब रस्त्यावरची वाहतूक काही काळासाठी विस्कळित झाली. 

शेतकरी - अधिकाऱ्यांत बाचाबाची 
नवीन शासन निर्णयामध्ये बॅंकांऐवजी सेवा केंद्रांवर केवळ ऑनलाईन विमा भरायचा आहे. त्यामुळे बॅंकांनी विमा भरुन घेण्यास नकार दिल्याने शेतकरी व बॅंक अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडले. एकूणच शासनानेच असा दुहेरी निर्णय घेऊन शेतकऱ्यांना निराश केले आहे. दरम्यान, केवळ सेवा केंद्रांवर ऑनलाईन विमा घेण्यामुळे सर्व कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करण्यासाठी मोठा वेळ लागत आहे. तसेच, बुधवारीही ऑनलाईन सर्व्हरची स्पीड कमी असल्यामुळे विमा भरण्याची गती मंदच होती.

Web Title: beed news farmer Crop insurance