ऑनलाइन नोंदणीमुळे हमी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

बीड - कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन भरून नाकीनऊ आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उडीद, मूग विक्रीसाठीही ऑनलाइनचा फेरा लावल्याने शेतकऱ्यांनी हमी केंद्राकडे पाठ फिरविली आहे. यावर्षी नाफेडमार्फत मूग व उडीद खरेदीसाठी शेतकऱ्यांवर लावलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी हमी केंद्राकडे पाठ फिरविल्याने व्यापाऱ्यांची चांदी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सहा केंद्रांवर केवळ ९७१ शेतकऱ्यांनी नोंदी केल्या आहेत. यातील धारूरच्या केंद्रावर तर केवळ दोन शेतकरीच आले आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी उडीद, मूग आणि सोयाबीन या नगदी पिकाला प्राधान्य दिले.

बीड - कर्जमाफीचे अर्ज ऑनलाइन भरून नाकीनऊ आलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीमागे उडीद, मूग विक्रीसाठीही ऑनलाइनचा फेरा लावल्याने शेतकऱ्यांनी हमी केंद्राकडे पाठ फिरविली आहे. यावर्षी नाफेडमार्फत मूग व उडीद खरेदीसाठी शेतकऱ्यांवर लावलेल्या जाचक अटींमुळे शेतकऱ्यांनी हमी केंद्राकडे पाठ फिरविल्याने व्यापाऱ्यांची चांदी झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात सहा केंद्रांवर केवळ ९७१ शेतकऱ्यांनी नोंदी केल्या आहेत. यातील धारूरच्या केंद्रावर तर केवळ दोन शेतकरीच आले आहेत. यंदा पाऊस चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी उडीद, मूग आणि सोयाबीन या नगदी पिकाला प्राधान्य दिले. यावर्षी उडीद, सोयाबीन आणि मूग असे मिळून जवळपास तीन लाख हेक्‍टरवर पेरणी केली. यात जवळपास अडीच लाख शेतकरी आहेत.

सध्या उडीद, मूग आणि सोयाबीनची  पूर्णत: काढणी झाली असून विक्री सुरू आहे; परंतु शासनाने ऑनलाइनचा घाट घातल्याने ‘भीक नको पण कुत्रं आवर’ अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे. शेतकरी कर्ज माफीत निकष आणि अटी लाधणाऱ्या सरकारने उडीद व मूग खरेदीतही अशीच मेख मारली आहे. उडीद आणि मूग खरेदीसाठी १२ पर्यंत फॅट असावी, एकरी आठ क्विंटलच खरेदी होईल. त्यात माती, काडी, कचरा चालणार नाही असे शासनाचे निकष आहेत, तर १२ पेक्षा जादाचे फॅट असणारे आणि सरसकट घेण्याची तयारी दर्शविली आहे.

जिल्ह्यात सोयाबीन पीक जवळपास दीड लाख हेक्‍टरवर घेण्यात आलेले आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा हा माल दर पाडून घेण्याचे धोरण ठेवल्याने सोयाबीन उत्पादकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. १२ पेक्षा जादाचे फॅट असणारे सोयाबीन शासकीय खरेदी केंद्रावर घेतले जात नाही. तर, व्यापारी मात्र येईल तसे आणि सरसकट सोयाबीन खरेदी करीत असून, त्यास २२०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल दर दिला जात आहे. जिल्ह्यात ११ तालुक्‍यांत बाजार समित्या असून त्या ठिकाणी हमीकेंद्र सुरू करणे अपेक्षित आहे; परंतु आतापर्यंत केवळ सहाच तालुक्‍यात नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात खरेदी कधी सुरू होईल, हे सांगणे कठीण आहे. हमीकेंद्र सुरू होईपर्यंत शेतकरी आपल्या अडचणींमुळे आहे ते धान्य व्यापाऱ्यांच्या झोळीत मिळेल त्या भावाने विक्री करून मोकळे होतील असे चिन्ह आहेत.

व्यापारी झाले मालामाल
शासनाने उडिदाला ५४००, मूग ५५७५, तर सोयाबीनला ३०५० हमीभाव जाहीर केला आहे; परंतु अद्याप हमी केंद्रावर खरेदी सुरू नसल्याने इकडे व्यापाऱ्यांनी जितक्‍या प्रमाणात पाडून मागता येईल त्या प्रमाणात भाव पाडले आहेत. सोयाबीन २२००, तर उडीद ३८०० हजार, मूग ४००० च्या दरात खरेदी सुरू आहे. यात व्यापारी मालामाल झाले आहेत.