दोनशे खाटांच्या रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

बीड - जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या मंजूर २०० खाटांच्या विस्तारित जागेचा प्रश्न पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाकडून जागेचा आगाऊ ताबा रुग्णालयास देण्याचे आदेश गुरुवारी (ता.१०) विधान भवन येथील बैठकीत दिले. दरम्यान, बीड येथे या दोनशे खाटांसह रुग्णालयाची ३५० खाटांची नवीन सुसज्ज इमारत होणार असून त्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्याच्या सूचना देऊन कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. याबाबत ‘सकाळ’ने वारंवार रुग्णालयातील गैरसोयींबद्दल वृत्त प्रसिद्ध केले होते. 

विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री पंकजा मुंडे यांची बीड नगरपालिका व जिल्ह्यातील विविध समस्यांची सोडवणूक करण्यासाठी गुरुवारी बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील निर्देश दिले. बैठकीस आमदार विनायक मेटे, आमदार जयदत्त क्षीरसागर, बीडचे नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, नगर विकास विभागाचे सचिव नितीन करीर, सी. पी. जोशी, अप्पर जिल्हाधिकारी अनिल पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे उपस्थित होते.

बीड येथील मंजूर २०० खाटांच्या रुग्णालयासाठी निर्माण झालेल्या जागेचा प्रश्नाचा तिढा या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सोडविला. रुग्णालयालगतची गृह विभागाची जागा असून सदर जागेचा आगाऊ ताबा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.  यामुळे २०० खाटांसह मातृत्व बाल आरोग्यासाठी १०० आणि आयुष रुग्णालयाकरिता ५० अशी एकूण ३५० खाटांची नवीन इमारत लवकरच बीडमध्ये उभी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत ‘सकाळ’ने वारंवार वृत्त प्रसिद्ध करून रुग्णालय जागेचा तसेच आरोग्य सुविधांचा प्रश्न चव्हाट्यावर आणला होता.