'देश वाचविण्यासाठी पंतप्रधानांनी देशात राहावे'

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

बीड -  ‘‘देशात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. गतवर्षी १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरुण बेरोजगार होत आहेत. विदेशात फिरून आणि सूट बदलून देश बदलणार नाही, हा देश वाचवायचा असेल तर त्यासाठी पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे आहे,’’ अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केली.

बीड -  ‘‘देशात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. गतवर्षी १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. तरुण बेरोजगार होत आहेत. विदेशात फिरून आणि सूट बदलून देश बदलणार नाही, हा देश वाचवायचा असेल तर त्यासाठी पंतप्रधानांनी देशात राहणे गरजेचे आहे,’’ अशी टीका विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनी केली.

‘एआयएसएफ’चा संविधान बचाव लाँग मार्च रविवारी (ता. सहा) बीडला पोचला. त्यानिमित्त ‘आशीर्वाद लॉन्स’मध्ये आयोजित ‘रोहित ॲक्‍ट परिषदे’त ते बोलत होते. प्रारंभी चातुर्वर्ण्य व्यवस्थेचे प्रतीक म्हणून मांडलेली मडक्‍यांची उतरंड आसुडाने फोडून कार्यक्रमाला सुरवात झाली. या वेळी तरुणाईबरोबरच थोरांचीही मोठी उपस्थिती होती.

‘‘शेतमालाला हमीभावाचा वायदा करणाऱ्या पंतप्रधानांनी ‘प्रधानमंत्री पीकविमा योजने’चा गाजावाजा केला. प्रत्यक्षात पिकांना नुकसानभरपाई तुटपुंजी मिळाली; मात्र विमा कंपनीला वर्षाकाठी १० हजार कोटींचा नफा झाला. दुसरीकडे तीन वर्षांत ६० हजार कोटी खर्च करूनही गंगा नदीचे पात्र दूषितच आहे. हा अनाठायी खर्च करण्यापेक्षा तो पैसा शेतकऱ्यांना मदत स्वरूपात दिला गेला असता तर शेतकरी आत्महत्या काही प्रमाणात थांबल्या असत्या,’’ असे सांगत दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांच्या न्यायासाठी व शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी देशातील तरुणांनी मौन सोडून रस्त्यावर उतरावे, असे आवाहन कन्हैयाकुमार यांनी केले.

‘‘आज देशाची परिस्थिती बिकट होत आहे. गांधीजींचे नातू हरतात आणि गोडसेंचा वारसा चालविणारे जिंकतात, अशी परिस्थिती आहे. मोदी निवडून आलेले पंतप्रधान आहेत. म्हणून आम्ही संसदीय मार्गाने प्रश्‍न विचारत आहोत. त्यांनी हिटलरची चाल चालू नये. मोदी अपराजित आहेत असे त्यांना वाटते. त्यांनी भ्रमात राहू नये. या व्यवस्थेच्या डोळ्यांत डोळे घालून प्रश्‍न करावे लागतील. आत्मसन्मानासाठी झगडावे लागेल,’’ असे आवाहनही त्यांनी केले.

जर ‘एक देश, एक टॅक्‍स’ असेल तर ‘एक देश, एक न्याय’, ‘एक देश, एक शिक्षणव्यवस्था’, ‘एक देश, एक आरोग्यव्यवस्था’ हे धोरण का राबवीत नाहीत?, असा सवाल त्यांनी केला.

‘‘देशात व्यवस्थेच्या नावाखाली तमाशा सुरू आहे. याविरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरविले जाते; मात्र देश वाचवायचा असेल तर याविरोधात आवाज उठवावाच लागेल. नुसत्या सभा घेऊन व भाषणे करून हे होणार नाही, तर यासाठी प्रत्येकाने रस्त्यावर उतरावे लागेल,’’ असेही कन्हैयाकुमार म्हणाले.