पोलिस महिलेच्या लिंगबदलास 'IG' यांचा नकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

न्यायालयीन लढाईची कर्मचारी महिलेची तयारी
लिंग बदलानंतर पुन्हा शारीरिक चाचणी घेऊन तिला पोलिसामध्ये राहता येईल, असा दावा संबंधित कर्मचाऱ्याच्या वकिलाने केला आहे. अहमदाबादमध्येही अशी घटना घडल्याचा संदर्भ त्यांनी यासाठी दिला. पोलिस महासंचालकांनी लिंग बदलासाठी परवानगी नाकारली असली तरी शरीरात बदल जाणवू लागल्याने महिला कर्मचाऱ्याने लिंग बदलाची मानसिकता केली असून यावर ती ठाम आहे. त्यासाठी वेळ पडल्यास न्यायालयीन लढाईची तयारीही तिने ठेवली असल्याचे समजते.

बीड : येथील एका महिला कर्मचाऱ्याने लिंग बदलासाठी रजेचा अर्ज केल्याने अधिकाऱ्यांसमोर पेचप्रसंग निर्माण झाला होता. पोलीस अधीक्षकांनी हा अर्ज विशेष पोलीस महानिरीक्षक व महासंचालक यांच्याकडे पाठविला होता. दरम्यान सदर महिला पोलिस कर्मचाऱ्याची पोलिस सेवेतील निवड ही महिला म्हणून झाली असून लिंगबदल केल्यास सदर कर्मचारी निवडीसाठी अपात्र ठरत असल्याने पोलिस महासंचालक सतीश माथुर यांनी लिंगबदलास परवानगी नाकारल्याची माहिती पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिली. दरम्यान रजा घेणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क असल्याने रजेला आपण रजा मंजुर करणार असल्याचेही पोलिस अधीक्षक जी.श्रीधर म्हणाले. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथील पोलिस दलातील एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने २३ जून रोजी मुंबईतील जेजे हॉस्पीटलमध्ये स्वतःची शारीरिक तपासणी व शरीरातील हार्मोनची तपासणी केली होती. शरिरात बदल जाणवु लागल्याने ही तपासणी केली होती. तपासणीनंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने १७ सप्टेंबरला सदर कर्मचारी महिलेने लिंग बदलण्यासाठी सुट्टी हवी असल्याचा रितसर अर्ज पोलिस अधीक्षकांकडे केला. दरम्यान अशा कारणासाठी पोलिस वर्तुळात पहिल्यांदाच अर्ज आल्याने त्यावर काय निर्णय घ्यावा, असा पेच पोलिस अधीक्षकांसमोर पडला. रजा मिळणे हा कर्मचाऱ्याचा हक्क असला तरी ज्या कारणासाठी रजा हवी आहे ते कारण वेगळे असल्याने पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी हा अर्ज पोलिस महानिरीक्षक व पोलिस महासंचालकांकडे पाठविला. 

दरम्यान महिला पोलिस कर्मचाऱ्याने लिंग बदलासाठी रजेचा अर्ज केल्याची बाब माध्यमांमध्ये समोर आल्यावर या प्रकरणाची व्यापक चर्चा झाली व या प्रकरणाकडे संपूर्ण पोलिस वर्तुळाचे लक्ष लागले. यामध्ये पोलिस सेवेत असलेल्या सदर महिलेची निवड ही महिला गटातून झाली असून व आता लिंग बदल केल्यास सदर कर्मचारी ज्या गटातून निवड झालेली आहे त्या गटाला अपात्र ठरत असल्याने पोलिस महासंचालक सतीष माथुर यांनी लिंग बदलासाठी मागितलेली परवानगी नाकारली असल्याची माहिती पोलिस अधीक्षक जी.श्रीधर यांनी दिली. याउपरही सदर कर्मचारी महिलेने लिंगबदल केल्यास तिच्या नोकरीवर गंडांतर येऊ शकते. 

रजा मिळणे हा कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे सदर कर्मचारी महिलेला रितसर रजा मंजूर केली जाईल. परंतु महिलेने रजा अर्जात लिंग बदलासाठीची परवानगी मागीतली होती. त्यामुळे सदर अर्ज पोलिस महासंचालकांकडे पाठविला होता. त्यांनी या लिंग बदलास परवानगी नाकारली आहे. 
- जी. श्रीधर, पोलिस अधीक्षक बीड.

Web Title: beed news lady police's transgender appeal rejected