लाईनमन छे.. वीजचोर, थकबाकीदार आणि साहित्यचोरही

लाईनमन छे.. वीजचोर, थकबाकीदार आणि साहित्यचोरही

बीड: वीजचोरी होत असल्याची ओरड कायम महावितरण करत असते. पण, महावितरणमधील कर्मचारीच वीजचोरीत माहिर असल्याचे बुधवारी (ता. 21) समोर आले. येथील 60 हजार रुपयांची वीजचोरी करणाऱ्या लाईनमनकडे लाखभर रुपयांची थकबाकी, अर्धा लाख रुपयांचे चालू वीज बील आणि महावितरण कंपनीचे साहित्यही आढळून आले. यामुळे कुंपनच शेत खात असल्याचे दिसते.

विशाल नारायण घाडगे असे या लाईनमनचे नाव आहे. बुधवारी सायंकाळी अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांच्या पथकाने केलेल्या पाहणीत हा सर्व प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अन्याय झाला आणि इतर प्रश्नांबाबत तांत्रिक कर्मचाऱ्यांचे बुधवार पासून अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु आहे. यामध्ये विशाल घाडगेही आघाडीवर होते. मात्र, सायंकाळी घाडगे अन्याय झालेला कर्मचारी नाही तर महावितरण कंपनीत राहून कंपनीचीच चोरी करण्याचा प्रकार उघड झाला. घाडगेच्या घरी पाहणीत त्याच्याकडे ९६ हजार रुपयांची थकबाकी असल्याने त्याने मिटरच बदलले. नवीन मिटरच्या वीज वापराची रिडींगही ६७०० युनिट एवढी म्हणजेच ५० हजार रुपयांच्या घरात आहे. त्यावर कडी म्हणजे त्याने पुन्हा ६० हजार रुपयांची वीजचोरी केली आहे. त्याच्या घरात महावितरण कंपनीचे वीज मिटर, स्वीच, लोखंडी चॅनल, लोखंडी क्लॅम्प, फ्युज असे साहित्यही आढळले आहे. कंपनीचे कनिष्ठ अभियंता संतोष जायभाये लातूर येथील महावितरणच्या पोलिस ठाण्यात या चोरीची फिर्याद नोंदवण्यास गेल्याचे अधीक्षक अभियंता अजिनाथ सोनवणे यांनी सांगीतले.

सौभाग्यवती नगरसेविका
दरम्यान, विशाल घाडगे यांच्या सौभाग्यवती बीड नगर पालिकेच्या नगरसेविका आहेत. सामान्य व गरिबांकडून वीजचोरी झाल्यास कडक कारवाई करणारे महावितरण आता त्यांच्याच कंपनीतील कर्मचारी आणि राजकीय पार्श्वभूमी असलेल्यांवर कोणती पावले उचलतात हे पाहणे महत्वाचे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com