शेतकऱ्यांनी अडविला राष्ट्रीय महामार्ग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

माजलगाव - पश्‍चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर उसाला भाव देण्यात यावा, तसेच पीकविम्याचे तत्काळ वाटप करण्यात यावे या मागणीसाठी तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग २२२ परभणी फाटा येथे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता.१) आंदोलन केले. 

ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उसाला साडेतीन हजार रुपये भाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी हंगाम सुरू झाला तरी भाव जाहीर केले नाही. बॅंकेच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचे वाटप झालेले नाही. तत्काळ पीकविमा वाटप करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाभीषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कोयता बंद आंदोलन सुरू केले आहे. मागील दोन-तीन दिवसांत साखर कारखान्याकडे जाणारी वाहने अडवून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. बुधवारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ परभणी फाटा येथे आंदोलन करीत रस्ता अडविला, या आंदोलनामुळे वाहतूक एक  तास ठप्प झाली होती. आंदोलनादरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

साखर कारखानदारांनी उसाचा गाळप हंगाम सुरू केला आहे. प्रत्यक्षात मात्र उसाचा भाव जाहीर केलेला नाही. उसाचा भाव पश्‍चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर जाहीर करण्यात यावा, तसेच पीकविम्याचे वाटप करण्यात यावे या मागणीसाठी कोयता बंद आंदोलन सुरू केले आहे. 
-गंगाभीषण थावरे, अध्यक्ष शेतकरी संघर्ष समिती

 आंदोलनस्थळी दंगल नियंत्रण पथक
राष्ट्रीय महामार्गावर होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनात कसलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी आंदोलनस्थळी दंगल नियंत्रण पथकास पाचारण केले होते.