पोलिसांकडून हद्दपारीच्या कारवायांमध्ये वाढ

पोलिसांकडून हद्दपारीच्या कारवायांमध्ये वाढ

बीड - सध्याची गणेशोत्सवाची लगबग व आगामी काळातील बकरी ईदचा उत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना राबविण्यात येत आहेत. सणोत्सवामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस दलाने प्रतिबंधात्मक तसेच हद्दपारीच्या कारवायांची संख्या यंदा वाढविली आहे. याशिवाय जिल्हाभरात ठिकठिकाणी शांतता समितीच्या बैठकाही घेण्यात येत आहेत. उत्सवकाळात अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे. 

गणेशोत्सव काळात जिल्ह्यात शांतता राहावी म्हणून पोलिस दलाकडून समाजकंटक, गुंड तसेच रेकॉर्डवरील गुन्हेगार यांच्यावर वेगवेगळ्या कलमांतर्गत प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच हद्दपारीच्या कारवाईसाठीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे पाठविलेले आहेत. उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात शांतता समिती व मोहल्ला समितीच्या आतापर्यंत ८० बैठका घेण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यात तब्बल ५३९ ग्राम सुरक्षा दले निर्माण करण्यात आली आहेत. सणोत्सव शांततेत पार पडण्यासाठी पोलिस दलाकडून अधिक खबरदारी घेतली जात आहे.

तगड्या बंदोबस्ताचे नियोजन
गणेशोत्सव व बकरी ईदच्या निमित्ताने पोलिस प्रशासनाने तगड्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. बंदोबस्तासाठी दोन अतिरिक्‍त पोलिस अधीक्षक, ९ पोलिस उपअधीक्षक, २० पोलिस निरीक्षक, ६० सहायक पोलिस निरीक्षक, ६४ पोलिस उपनिरीक्षक या अधिकाऱ्यांसह १८३६ पोलिस कॉन्स्टेबल, ९५ एसआरपीएफ पोलिस, आरसीपीचे १२० कर्मचारी, ६०० पुरुष होमगार्ड तर १०० महिला होमगार्ड तैनात असणार आहेत. 

३४६ गावांमध्ये एकच गणपती
जिल्ह्यात गतवर्षी तब्बल ६२५ गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ ही संकल्पना राबविली गेली होती. यंदा निम्म्या म्हणजेच ३४६ गावांमध्ये ‘एक गाव-एक गणपती’ हा उपक्रम राबविण्यात आला आहे. अद्याप यासंदर्भात माहिती घेण्याची प्रक्रिया सुरु असून यात सहभागी गावांच्या आकडेवारीत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. जिल्ह्यात प्रतिष्ठापना केलेल्या गणेश मंडळांची संख्या जवळपास १२४१ इतकी असून यामध्ये दोन गाव एक गणपतीची संख्या केवळ एक तर एक गाव दोन गणपतींची संख्या ४९ इतकी आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com