चोरट्यांनी लुटलेले सोने पोलिसांनी केले परत

चोरट्यांनी लुटलेले सोने पोलिसांनी केले परत

बीड - मागील तीन महिन्यांत गंठणचोरी, घरफोडी व जबरी लूट या गुन्ह्यांचा आलेख वाढला होता; मात्र गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथक, तसेच संबंधित ठाण्यातील पोलिसांनी आरोपींचा छडा लावत चोरीला गेलेला लाखमोलाचा ऐवज परत मिळविण्यात यश मिळविले आहे. न्यायालयाच्या परवानगीने सोमवारी (ता.२५) हे दागिने संबंधितांना परत करण्यात आले. चोरांनी लुटलेले सोने दसऱ्याआधी परत मिळाल्याने संबंधितांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

गेल्या तीन महिन्यांत २२ गुन्ह्यांचा छडा पोलिसांनी लावला. त्यात नऊ लाख तीन हजार ४३२ रुपयांचे ४६६.७० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. आरोपींकडून हस्तगत केलेले हे दागिने न्यायालयाच्या परवानगीने संबंधितांना परत करण्यात आले आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयातील बैठक कक्षात झालेल्या या कार्यक्रमास अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपअधीक्षक सुधीर खिरडकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक घनशाम पाळवदे व ठाणेप्रमुख उपस्थित होते. दरम्यान दसरा सणात आपट्याची पाने सोने म्हणून लुटल्यानंतर ते एकमेकांना भेट देत शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. पोलिस प्रशासनाने चोरी गेलेले दागिने परत मिळवून दिल्याने संबंधित कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

ज्यांचा मुद्देमाल चोरीस गेला, त्यांना तो परत करताना मनस्वी आनंद होत आहे, त्यामुळे जनतेच्या मनात पोलिसांची प्रतिमा उंचावेल असा आशावाद पोलिस अधीक्षकांनी व्यक्त केला. चोऱ्या, घरफोड्या, मंगळसूत्र चोरी व जबरी लूट अशा गुन्ह्यांना आळा बसविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न होत आहेत; मात्र असे गुन्हे घडल्यानंतर तपास पूर्ण होताच संबंधितांना मुद्देमाल कमी कालावधीत परत करण्याचा आपला संकल्प असून त्यासाठी दर तीन महिन्यांनी असा उपक्रम घेण्याचा विचार असल्याचेही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com