बसेस वेळेवर सोडण्यासाठी विद्यार्थ्यांचे माजलगावात ठिय्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

विविध गावांतुन शहरामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. परंतु रोजच बसेस वेळेवर येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तालुक्यातील माळेवाडी गावातुन १०० मुले, मुलींना किट्टी आडगाव, सावरगाव व माजलगाव या ठिकाणी येण्यासाठी स्पेशल गाडी सोडण्यात यावी.

माजलगाव : ग्रामीण भागातील एसटी बसेस वेळेवर सोडाव्यात, माजलगाव ते माळेवाडी (सुलतानपुर)साठी स्वतंत्र बस सोडावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज (ता. २९ शनिवारी) येथील आगारप्रमुखांच्या दालनात आणि बसस्थानकावर ठिय्या आंदोलन केले. 

तालुक्यातील विविध गावांतुन शहरामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येतात. परंतु रोजच बसेस वेळेवर येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तालुक्यातील माळेवाडी गावातुन १०० मुले, मुलींना किट्टी आडगाव, सावरगाव व माजलगाव या ठिकाणी येण्यासाठी स्पेशल गाडी सोडण्यात यावी. ज्या बस आहेत, त्यांच्या फे-या नागरिकांनीच भरून जातात त्यामुळे तिकीट काढण्यासाठी गाडी अर्धा तास एकाच ठिकाणी उभी राहत असल्यामुळे विद्याथ्र्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील बसेस वेळेवर सोडण्यात याव्यात, तसेच विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र बस सोडाव्यात यासह विवीध मागण्यांसाठी  विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले. 

यावेळी आधार संस्थेच्या सत्यभामा सौंदरमल, बाजार समिती संचालक नितीन नाईकनवरे, मल्हार सेनेचे तालुकाध्यक्ष विलास नेमाणे, उपसभापती जयदत्त नरवडे, जिल्हा परिषद सदस्य कल्याण आबुज, सरपंच सुभाष लोखंडे यांनी आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान मागण्यांचे निवेदन प्रभारी आगारप्रमुख श्री. तिडके यांना देण्यात आले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा: