जयभवानी करणार यंदा सात लाख मेट्रिक टनांचे गाळप

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

बीड - गेवराई तालुक्‍यातील शेतकऱ्यांच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू असलेला गढी येथील जयभवानी सहकारी साखर कारखाना यंदा सात लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करणार आहे. कारखान्याचा ३५ व्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन शनिवारी (ता. ३०) विजयादशमीच्या दिवशी होणार आहे. 

सकाळी श्री क्षेत्र नारायणगडाचे मठाधिपती शिवाजी महाराज व श्री क्षेत्र चाकरवाडीचे महादेव महाराज, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांची उपस्थिती असेल. दुष्काळामुळे तीन वर्षे गाळप बंद असलेला कारखाना सुरू करण्यासाठी यंदा नवीन यंत्रसामुग्री बसविली आहे. यंदाच्या हंगामात सात लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार अमरसिंह पंडित यांनी दिली. यंदाच्या हंगामातून कर्जफेडीचे नियोजन केले आहे. हंगाम सुरू करण्यासाठी मागील सात महिन्यांपासून नियोजन सुरू असून कामगार यंत्रसामुग्रीच्या सज्जतेसाठी प्रयत्नात आहेत. कार्यक्षेत्रातील उपलब्ध उसाचे संपूर्ण गाळपाचे नियोजन केले असून शेतकऱ्यांनी कारखान्याकडे उसाच्या नोंदी केल्या असल्याचे श्री. पंडित म्हणाले.  त्यामुळे जयभवानी कारखान्याचा या वर्षीचा गाळप हंगाम यशस्वी होणार असा विश्‍वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. गेवराई तालुका आणि साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आग्रहामुळे संचालक मंडळाने प्रतिकूल परिस्थितीत कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार अमरसिंह पंडित म्हणाले.