सव्वाशे क्विंटल तुरीचा गोलमाल; शेतकऱ्यांनाच गुन्हे नोंद करण्याची धमकी 

सव्वाशे क्विंटल तुरीचा गोलमाल; शेतकऱ्यांनाच गुन्हे नोंद करण्याची धमकी 

बीड - हमीभावाने खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या 121 क्विंटल तुरीचे तीन महिन्यांपासून पैसे तर दिलेच नाहीत, उलट पैशाची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांनाच गुन्हे नोंद करण्याची नोटीस देण्याचा प्रताप बीड जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी आमदार अमरसिंह पंडित यांच्या पाठपुराव्यानंतर चौकशीचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. 

मागच्या हंगामात तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाल्यानंतर खरेदीचा प्रश्‍न जटिल झाला. चोहोबाजूने मागणी आणि सरकार विरोधात टीका झाल्यानंतर शासनाने नाफेडमार्फत हमीभावाने तूर खरेदी केली. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनमार्फत ही खरेदी झाली. गेवराईच्या बाजार समितीत  बीड जिल्हा कृषी औद्योगिक सर्व सेवा सहकारी संस्थेमार्फत खरेदी केंद्र उघडण्यात आले. दरम्यान, पाचेगाव (ता. गेवराई) येथील शहादेव खरसाडे, गणेश खरसाडे, शकुंतला देशमुख, गणेश कापसे, नागनाथ कापसे, सुरेश दाभाडे, तुकाराम ननवरे या शेतकऱ्यांनी या खरेदी केंद्रावर तूर आणली. या शेतकऱ्यांनी 121 क्विंटल तूर विकली. शेतकऱ्यांकडे तुरीसाठीचे टोकण, केंद्रावर विक्री केल्याचे पुरावे आदी सर्व गोष्टी आहेत. 20 ते 31 मेच्या दरम्यान या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर तूर दिल्यानंतर त्यांना अजूनही या तुरीचे पैसेच मिळाले नाहीत, हे विशेष. केंद्रावर विकलेल्या इतर शेतकऱ्यांना तुरीचे पैसे मिळाल्यानंतर वरील शेतकऱ्यांनी पैशासाठी पाठपुरावा केला; मात्र संस्थेच्या अधिकाऱ्यांनी पैसे देण्याऐवजी शेतकऱ्यांनाच गुन्हे दाखल करण्याची नोटीस दिली. मागील अनेक दिवसांपासून हे शेतकरी विविध कार्यालयांत खेटे घालत आहेत. दरम्यान, 121 क्विंटल तुरीचे साधारण सहा लाख रुपये होतात. हा गोलमाल कोण्या अधिकाऱ्याने केला, हे चौकशीनंतर उघड होणारच आहे. 

आमदार पंडित यांच्या तक्रारीनंतर दखल 
संबंधित शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानंतर आमदार अमरसिंह पंडित यांनी मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालकांकडे तक्रार केली. पैसे न देता गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्याचा प्रकार गंभीर असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. या प्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी तालुका सहायक निबंधकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश गुरुवारी (ता. 16) दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com