टंकलेखन यंत्राच्या युगाचा अस्त

दिनेश पोरे
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

आज शेवटची परीक्षा, यापुढे संगणकावरच होणार टंकलेखन
भूम - सध्याच्या संगणकाच्या काळात टंकलेखन यंत्राचे युग अखेर संपणार असून, शनिवारी (ता. 12) राज्यात टंकलेखन यंत्रावर शेवटची टंकलेखन परीक्षा घेण्यात येणार आहे.

आज शेवटची परीक्षा, यापुढे संगणकावरच होणार टंकलेखन
भूम - सध्याच्या संगणकाच्या काळात टंकलेखन यंत्राचे युग अखेर संपणार असून, शनिवारी (ता. 12) राज्यात टंकलेखन यंत्रावर शेवटची टंकलेखन परीक्षा घेण्यात येणार आहे.

भारतात प्रथम इंग्रजांनी टाईपरायटरवर शासकीय पत्रव्यवहार सुरू केला होता. दरम्यान, स्वातंत्र्यानंतर देशातील प्रत्येक प्रांतात भाषावार टंकलेखनाचे कोर्स सुरू झाले. सरकारी नोकरी असो किंवा खासगी नोकरी, उमेदवारासाठी टंकलेखन हे अनिवार्य होते. टंकलेखनाच्या अंडरफूड, रेमिंग्टन, तसेच गोदरेज कंपनीच्या यंत्रांवर विद्यार्थी टंकलेखनाचे धडे घेऊन इंग्रजीसाठी 30, 40, 50, 60 शब्द प्रति मिनीट, मराठी व हिंदीसाठी 30, 40 शब्द प्रति मिनीट या वेगाच्या परीक्षा देत असत. दरम्यानच्या काळात अनेक कार्यालयांतून टंकलेखन यंत्र गायब होऊन त्याची जागा संगणकाने घेतली. प्रत्येक व्यवहार संगणकावर सुरू असल्याने टंकलेखन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली. संगणकाकडे वळणे दुरापास्त झाले हे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य टंकलेखन व लघुलेखन मुंबई या संघटनेने संस्थाचालकांना संगणक टायपिंगकडे वळविण्यासाठी भरीव मदत केली.

राज्य सरकारने 2015 पासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत संगणकावर टायपिंग सुरू करण्याचे आदेश दिले व प्रत्यक्ष काही भागांत संगणक टायपिंगच्या संस्था कार्यरत झाल्या. मात्र, काही संस्थांच्या विनंतीनुसार ऑगस्ट 2017 पर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. शुक्रवारी (ता. 11) मॅन्युअली टंकलेखन यंत्रावर होणारी परीक्षा सुरू झाली. शनिवारी (ता.12) काही विद्यार्थी परीक्षा देणार असून, ही टंकलेखन यंत्रावरील शेवटची परीक्षा ठरणार आहे.

संगणकावर स्पेशल स्किल
यापुढील काळात संगणकावर टायपिंग सुरू राहणार असून, इंग्रजी, मराठी, हिंदी 30 व 40 शब्द प्रति मिनीट, याबरोबरच संगणकासंबंधीची विशेष कौशल्याची एक जादा परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे.