मराठवाड्यात भूजल पातळीत मोठी घट

मराठवाड्यात भूजल पातळीत मोठी घट

औरंगाबाद - दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असतानाच भूजल पातळीनेही जलसंकट ओढावण्याचे संकेत दिले आहेत. एकूण ७६ पैकी ५६ तालुक्‍यांत मागील पाच वर्षांच्या तुलनेत नोंदली गेलेली घट दुष्काळाची दाहकता दर्शवित आहे. त्यामुळे भूगर्भातही उपलब्ध पाण्याचा वापर अतिशय काटेकोरपणे केल्याशिवाय गत्यंतर नसल्याचेच स्पष्ट होते. उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील भूजल पातळीत ७.३८ मीटरची घट नोंदली गेली आहे. 

यंदा मराठवाड्यात जून ते सप्टेंबर २०१८ दरम्यान सरासरी ६६६.४ मिलिमिटर पावसाच्या तुलनेत ६०५.५ मिलिमिटर पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात सरासरी ३३०.५३ मिलिमिटरच पाऊस पडला. अपेक्षित सरासरी पावसाच्या तुलनेत सरासरी २७५ मिलिमिटर पाऊस कमी पडला. सरासरी ४५.४ टक्‍के घट पावसात नोंदली गेली. याचा थेट परिणाम भूजलपातळीवर झाल्याचे दिसते आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने सप्टेबरअखेर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील ८७६ विहिरींचे निरीक्षण घेतले. या निरीक्षणाअंती औरंगाबाद जिल्ह्यातील भूजल पातळीत सरासरी १.७३ मीटरची घट नोंदली गेली. त्यापाठोपाठ जालना जिल्ह्यात २.०४ मीटर, बीड जिल्ह्यात २.०७ मीटर, लातूर जिल्ह्यात १.१५ मीटरपर्यंत तर उस्मनाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ४.०१ मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदली गेली आहे.

नांदेड जिल्ह्यात ०.४१ मीटर, परभणीत ०.०९ मीटर तर हिंगोली जिल्ह्यात ०.२० मीटरपर्यंत भूजल पातळीत घट नोंदली गेली आहे. सर्वाधिक पावसाचे प्रमाण राहिलेल्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्‍यातील भूजल पातळीत १.७९ मीटरची घट नोंदली गेली आहे. नांदेडमधीलच धर्माबाद तालुक्‍यातील भूजल पातळीतही १.१६ मीटर तर मुखेड तालुक्‍यातील भूजल पातळीत २.३३ मीटरपर्यंत घट नोंदली गेली आहे. 

निरीक्षणासाठी घेतलेल्या विहिरींची जिल्हानिहाय संख्या 
औरंगाबाद -१४१ 
जालना-११० 
परभणी-८७ 
हिंगोली-५५ 
नांदेड-१३४ 
लातूर-१०९ 
उस्मानाबाद-११४ 
बीड-१२६ 
------------ 
तालुकानिहाय पाणीपातळीतील घट 
पातळी - तालुके
-० ते १ मीटर - १६ 
-१ ते २ मीटर - २२ 
-२ ते ३ मीटर - ७ 
- ३ मीटरपेक्षा जास्त -११ 
- सरासरी पातळी - २०

अशी आहे तालुकानिहाय अपेक्षित पावसाच्या तुटीची अवस्था 
-  २० टक्‍के तूट - ११ 
- २० ते ३० टक्‍के तूट- १४ 
- ३० ते ५० टक्‍के तूट- ३८
- ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त तूट- ८
- सरासरी पेक्षा जास्त पाऊस - ५  

या तालुक्यात नोंदली घट
भूजल पातळीत वाढ नोंदल्या गेलेल्या तालुक्‍यात परभणी जिल्ह्यातील पालम, पूर्णा, परभणी, पाथ्री, जिंतूर, हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत, औंढा नागनाथ, नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, हिमायतनगर, नांदेड, अर्धापूर, भोकर, कंधार, लोहा, मुदखेड, उमरी, माहूर व लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्‍याचा समावेश आहे. 

मराठवाड्यातील भूजलाची सप्टेंबरअखेरची पातळी पाहता पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करणे अनिवार्य आहे. 
- डॉ. पी. एल. साळवे,  उपसंचालक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा औरंगाबाद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com