अडचणीतल्या भाजपला राष्ट्रवादीचेच "बुस्टर डोस' 

अडचणीतल्या भाजपला राष्ट्रवादीचेच "बुस्टर डोस' 

बीड - नेतृत्वाच्या कमकुवतपणामुळे अडचणीत आलेल्या जिल्ह्यातील भाजपच्या मदतीला ऐनवेळी राष्ट्रवादीच धाऊन आली आहे. ज्या-ज्या वेळी दिवंगत गोपीनाथ मुंडे किंवा त्यांचे कुटुंबीय राजकीयदृष्ट्या अडचणीत येते, त्यावेळी जिल्ह्यातील जनता भावनिक मुद्यावर त्यांची पाठराखण करते, हा इतिहास माहीत असतानाही धनंजय मुंडेंच्या खांद्यावर बंदूक ठेवत अजित पवारांनी दिवंगत मुंडेंच्या जन्मतारखेचा काढलेला वाद भाजपच्याच मदतीचा ठरू शकतो. भगवानगडापासून इतर काही बाबींची याला जोड दिली तर मग राष्ट्रवादीच भाजपला "बुस्टर डोस' पुरवत आहे की काय, अशी शंका येते. 

पाच वर्षांपूर्वी जिल्हा बॅंकेच्या मुद्याने भाजप बॅकफुटवर गेलेली असतानाच धनंजय मुंडेंचा पक्षांतराचा दिवंगत मुंडेंनी "बारामतीवाले घर फोडून माझे नेतृत्व संपवण्याच्या तयारीत आहेत' अशी भावनिक साद समाजासमोर घातली. यामुळे समाज एकवटला. अगदीच मागे पडण्याची चिन्हे असलेल्या भाजपने चांगली कामगिरी केली. परळी मतदारसंघात तर धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीला एकही गट जिंकता आला नव्हता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी धनंजय मुंडेंचे वक्‍तृत्व, आक्रमक भाषण आदी कौशल्यांमुळे त्यांना राष्ट्रवादीने विरोधी पक्षनेतेपद दिले; पण यातून राष्ट्रवादीच्या राजकीय गणितांइतकाच भाजपला फायदा झाला. केवळ, पंकजा मुंडेंना जिल्ह्यात शह देण्यासाठी धनंजय मुंडेंना पद दिल्याचा मुद्दा प्रत्येक वेळी भाजपकडून पुढे केला गेला. त्यातच विधानसभा आणि लोकसभा पोटनिवडणुकीत जिल्ह्यात भाजपला मोठे यश मिळाले; पण पुढे नेत्या पंकजा मुंडेंची सामान्यांना भेट न होणे, जिल्ह्यात फारसे न येणे, विकासाचे मोठे प्रकल्प न राबवता येणे यामुळे कार्यकर्ता, मतदार आणि वंजारा समाजही त्यांच्यापासून दुरावत होता. याचवेळी भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या भाषणाचा मुद्दा पुढे आला. यात राष्ट्रवादीचा संबंध होता वा नव्हता; पण पंकजा मुंडेंबाबत व्हायरल झालेल्या क्‍लिपनंतर धनंजय मुंडेंसह राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनी पंकजा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. यानंतर "समाजाचे नेतृत्व संपवण्याचे कारस्थान' होत असल्याचा तोंडी आणि सोशल मीडियावरील प्रचार सुरू झाला. त्यातून समाज एकवटण्यास मदत झाल्याचे दिसले होते. 

दरम्यान, आता जिल्हा परिषद निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरू आहे. भाजपमध्ये स्थान घट्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेत पंकजा मुंडेंसाठी सत्तांतर महत्वाचे आहे. मात्र, भाजप शिलेदारांच्या जोरावर झेंडा फडकणे कठीणच आहे. उमेदवार देण्याच्या पहिल्या डावातच पिछाडीवर गेलेल्या भाजपला मंगळवारी जिल्हा बॅंक प्रकरणाने आणखी मागे नेले. बॅंक अपहार प्रकरणातील शिक्षा झालेली बहुतेक मंडळी भाजपच्या दुसऱ्या फळीतले नेते आहेत. पण, यातच अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा संदर्भ देत दिवंगत मुंडेंच्या जन्मतारखेचा मुद्दा काढला. आता हाच मुद्दा भाजप जिल्ह्यात तापवू पाहत आहे. सोशल मीडियासह आता मुंडे भगिनींनी भाषणात हाच मुद्दा ऐरणीवर आणला आहे. जणू ऐन अडचणीच्या काळातच राष्ट्रवादीने भाजपला दिलेला हा आयताच बुस्टर डोस म्हणावा लागेल. 

दैवताच्या जयंतीच्या तारखेवर प्रश्‍न... 
तसे राज्यात ओबीसी व जिल्ह्यात वंजारा समाज हा दिवंगत मुंडेंच्या राजकारणाचा पाया आणि पवार विरोधहा कळस. कुठल्याही राजकीय घटनेला ते बारामतीशी जोडत आणि समाजापुढे भावनिक हाक देत. त्यातून समाज त्यांच्या मागे उभा राहिल्याचा इतिहास आहे. आता जन्मतारखेचा मुद्दा निघाल्यानंतर सोशल मीडियावर "दैवताच्या जयंतीच्या तारखेवर प्रश्‍न' अशा संताप व्यक्त करणाऱ्या पोस्ट फिरायला लागल्या आहेत. तसेच पदाधिकाऱ्यांची निषेध करणारी पत्रकेही निघू लागली आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com