भाजपचे आता मिशन महापालिका 

हरी तुगावकर 
शुक्रवार, 3 मार्च 2017

जिल्हा परिषदेवर स्थापनेपासून कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. या सत्तेला भारतीय जनता पक्षाने सुरुंग लावत एकहाती सत्ता खेचून घेत इतिहास घडविला. ही निवडणूक माजी मंत्री दिलीपराव देशमुख विरुद्ध पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर अशीच झाली.

लातूर - नगरपालिकेपाठोपाठ जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कौतुकास पात्र ठरलेल्या पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा आत्मविश्‍वास आता वाढला आहे. त्यामुळे त्यांनी आता मिशन महापालिका हाती घेतले आहे. निवडणुकीच्या अगोदरच आतापासूनच "फिफ्टी प्लस'चा नारा दिला जाऊ लागला आहे. 

जिल्हा परिषदेवर स्थापनेपासून कॉंग्रेसची एकहाती सत्ता होती. या सत्तेला भारतीय जनता पक्षाने सुरुंग लावत एकहाती सत्ता खेचून घेत इतिहास घडविला. ही निवडणूक माजी मंत्री दिलीपराव देशमुख विरुद्ध पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर अशीच झाली. यात श्री. निलंगेकर यांनी बाजी मारली. जिल्हा परिषदेत 58 पैकी 36 जागा मिळवत पक्षाचा झेंडा फडकविला. दहापैकी सात पंचायत समित्यांवर भाजपराज आणले. त्यामुळे ते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कौतुकास पात्र ठरले आहेत. 

मांजरा पट्ट्यात कॉंग्रेस घाट्यात 
लातूर व रेणापूर तालुका मांजरा, विकास, तसेच रेणा सहकारी साखर कारखान्यांमुळे मांजरा पट्टा म्हणून ओळखला जातो. प्रत्येक निवडणुकीत मांजरा पट्टा श्री. देशमुख यांच्या पाठीशी राहिला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही श्री. देशमुख यांना याच मांजरा पट्ट्याने साथ दिली आहे. असे असले तरी या पट्ट्यात चौदापैकी सहा गटांवर व रेणापूर पंचायत समितीवर "कमळ' उमलेले आहे. ही बाब कॉंग्रेससाठी  चिंताजनक आहे. या पट्ट्यात कारखान्याचे उपाध्यक्ष, संचालक, जिल्हा बॅंकेचे संचालक, विद्यमान जिल्हा परिषदेचे सदस्य अशा अनेक पदाधिकाऱ्यांची गावे आहेत. ही सर्व गावे कॉंग्रेसला "मायनस' गेली आहेत. "साहेबां'च्या पुढे पुढे करणारे, त्यांच्या वाहनात बसणाऱ्या या पदाधिकाऱ्यांची गावात किती "पत' आहे हे या निवडणुकीच्या निमित्ताने दिसून आले आहे. पाडापाडीचे राजकारण करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांचा नेत्यांनीच विचार करण्याची गरज आहे. 

फिफ्टी प्लसचा नारा 
जिल्हा परिषदेवर आता भाजपराज आले आहे. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली हे पहिल्यांदाच घडले आहे. या माध्यमातून श्री. निलंगेकर यांची जिल्ह्याच्या राजकारणात एन्ट्री झाली आहे. प्रत्येक निवडणूक जिंकत चालल्याने त्यांचा आत्मविश्‍वास वाढला आहे. यातून त्यांनी आता मिशन  महापालिकेचे नियोजन केले आहे. यात आतापासूनच फिफ्टी प्लसचा नारा द्यायला सुरवात केली आहे. 

फोडाफोडीचे राजकारण 
लातूर महापालिकेवर कॉंग्रेसचीच सत्ता आहे; पण आता महापालिकेवर सत्ता आणणे हे आता भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील काही मासे आपल्या गळाला लागतील का? याचा प्रयत्न भाजपकडून सुरू करण्यात आला आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या बुडत्या नावेत बसण्यापेक्षा भाजपच्या चालत्या नावेत बसून महापालिकेत येण्याचा प्रयत्न काही नगरसेवकांनी सुरू केला आहे. फोडाफोडीचे राजकारण कोणाच्या फायद्याचे ठरणार याकडे आता लक्ष लागले आहे. 

कॉंग्रेसकडून कामांचा धडाका 
महापालिकेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे. येत्या काही दिवसांत आचारसंहिता लागू शकते. त्यात जिल्हा परिषदेसारखे अपयश येऊ नये म्हणून कॉंग्रेस आतापासून काळजी घेत आहेत. यातून गेल्या काही दिवसांपासून शहरातील प्रत्येक वॉर्डावॉर्डात विकासकामांचा धडाका लावण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर आठवड्यातून नळाला दोन वेळा पाणी कसे सोडता येईल याचा प्रयत्न सुरू झाला आहे. 

तुरीचा बाजार शेतकरी बेजार 
लातूर ही तुरीसाठीची मोठी बाजारपेठ आहे. यावर्षी तुरीचे उत्पादन मोठे झाले आहे. त्यामुळे येथील आडत बाजारात तुरीची आवक मोठी आहे; पण व्यापाऱ्यांकडून हमी भावापेक्षा कमी दरानेच तुरीची खरेदी केली जात आहे. तर दुसरीकडे शासनाने तूर खरेदी केंद्रे सुरू केली आहेत. येथे आतापर्यंत दोन लाख क्विंटलपेक्षा जास्त तुरीची खरेदी करण्यात आली आहे; पण या केंद्रावर बारदानाच उपलब्ध नसल्याने ही खरेदी केंद्रे बंद पडली आहेत. त्यामुळे तुरीच्या बाजारात शेतकरी बेजार झाला आहे.

मराठवाडा

सेलू : सततच्या नापिकीने बँकेचे कर्ज कसे फेडावे व मुला, मुलीचा शिक्षणाचा खर्च कसा करावा. या विवंचनेतून शहरातील दत्तनगरातील...

12.54 PM

गेवराई - धारदार शस्त्रांसह कुऱ्हाडीचे घाव घालून दरोडेखोरांनी बॅंक अधिकाऱ्यासह त्याच्या पत्नीची हत्या केली. अशाच हल्ल्यात...

11.51 AM

औरंगाबाद - गणेशोत्सवासोबत विविध धार्मिक उत्सवांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस आयुक्तालयातर्फे घेण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत...

11.51 AM