अखेर भाजपचा महापौर होणार

जगदीश पानसरे
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

इच्छुक लागले कामाला
महापौर राजीनामा देणार हे स्पष्ट झाल्यामुळे भाजपमधले इच्छुक कामाला लागले असून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. राजू शिंदे, बापू घडामोडे, विजय औताडे, माधुरी अदवंत यांची नावे भाजपकडून चर्चेत आहेत. राजू शिंदे किंवा बापू घडामोडे यापैकी एका नावावर पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे.
 

औरंगाबाद- महापौर राजीनामा देणार की नाही ? या संदर्भातले रहस्य अखेर संपले असून येत्या 30 नोव्हेंबर रोजी बोलावण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे महापौर त्र्यंबक तुपे हे राजीनामा देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सेना-भाजपत झालेल्या करारानुसार शिवसेनेचे महापौरपदाचे पहिले दीडवर्ष ऑक्‍टोबरमध्ये संपले.

आज-उद्या, देणार-नाही देणार? या संभ्रमानंतर महापौर त्र्यंबक तुपे यांना मातोश्रीवरुन अखेर निरोप मिळाला असून ते पदाचा राजीनामा देणार असल्याने भाजपचा जीव भांड्यात पडला आहे.
तुपे यांनी नुकतेच दिवाळी स्नेहसंम्मेलन आयोजित केले होते. सर्वांचे तोंड गोड करून ते महापौर पदाचा राजीनामा देतील अशी आशा भाजपचे इच्छुक बाळगून होते. मात्र, तसे घडले नाही. भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व महापौर पदासाठी इच्छुक असलेल्यांनी पक्षश्रेष्ठींकडे तगादा लावला.

त्या दरम्यान पदाचा राजीनामा देणार असल्याचे एसएमएस स्वतः तुपे यांनीच पाठवायला सुरवात केली. 30 नोव्हेंबरच्या विशेष सर्वसाधारण सभेत तुपे महापौरपदाचा राजीनामा देणार आहेत. त्यानंतर ते शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे व जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्याकडेही राजीनामा पाठवणार आहेत. गेल्या महिनाभरापासून हे राजीनामा नाट्य रंगले होते, त्यावर 30 रोजी पडदा पडणार आहे.