रुग्णवाहिकेद्वारे ब्लॅक मनीची वाहतूक! 

jyotisingh-priya
jyotisingh-priya

जालना - पाचशे, हजारांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर काळ्या पैशावाल्यांचे धाबे दणाणले आहेत. जो तो आपल्याकडील काळ्या पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी धडपडत आहे. प्राप्तिकर विभाग, पोलिस व निवडणूक पथकांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात संशयास्पद रोकड जप्त केली आहे. असे असले तरी तपास पथकांना चकवा देण्यासाठी जालन्यातून चक्क रुग्णवाहिकेतून काळा पैसा पाठवला जात आहे. निवडणुकीच्या एक दिवस अगोदर शनिवारी (ता. 26) रात्री रुग्णवाहिकेतून भोकरदनकडे चक्क तीन कोटी रुपये पाठविण्यात आल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले. 

व्यापारी शहर असलेल्या जालन्यात हवाला रकमेचे व्यवहार मोठ्या प्रमाणात चालतात हे सर्वश्रुत आहे. मात्र, पाचशे, हजाराच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर हवाला व्यवहारांना ब्रेक लागला आहे. नोटाबंदीमुळे नगरपालिका निवडणूक लढवत असलेले पक्ष व उमेदवार चांगलेच अडचणीत सापडले. जालन्यात तपास पथकांनी आतापर्यंत 80 लाखांवर संशयास्पद रोकड जप्त केली आहे. दरम्यान, निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांना पैशाचे आमिष दाखवून आपल्या बाजूने वळविण्याचे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलिस यंत्रणेने शनिवारी रात्री उशिरापर्यंत संपूर्ण शहर पिंजून काढले. प्रत्येक चौकात उशिरापर्यंत गाड्यांची तपासणी सुरू होती. याच रात्री जालन्याहून भोकरदनकडे मोठी रक्कम घेऊन जाण्याचे काहींनी नियोजन केले. तपास पथकास संशय येऊ नये यासाठी एका व्यक्तीला रुग्ण म्हणून रुग्णवाहिकेत झोपविले. इमर्जन्सीचे सायरन वाजवत भरधाव वेगात आलेल्या रुग्णवाहिकेला खुद्द पोलिसांनीच अन्य वाहने हटवून रस्ता करून दिला. सुमारे तीन कोटींची असलेली ही रक्कम एका राजकीय व्यक्तीशी संबंधित होती, असे सूत्रांनी सांगितले. जालन्यातून यापूर्वीही रुग्णवाहिकेच्या आडून काळ्या पैशाची वाहतूक झाल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

बड्या व्यापाऱ्यांच्या क्‍लृप्त्या 
काळा पैसा पांढरा करण्यासाठी काही बडे व्यापारी वेगवेगळ्या क्‍लृप्त्या लढवत आहेत. ग्रामीण भागात शेतकऱ्यांना जुन्या नोटा देऊन अधिकच्या दराने कापूस खरेदी सुरू केली आहे. मध्यस्थाच्या मदतीने मजुरांच्या खात्यात पैसे भरले जात आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये एरवी कुठल्याही अधिकृत नोंदी न ठेवता होणाऱ्या ट्रान्सपोर्टच्या कोट्यवधींच्या व्यवहाराचे मागील वर्षभराचे रेकॉर्ड तयार करून अनेकांनी काळ्या पैशांची विल्हेवाट लावायला सुरवात केली आहे. परराज्यांतील कामगारांना ठेकेदारांच्या हमीवर वर्षभराचे पगार आगाऊ देण्यात येत असल्याची चर्चा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com