औरंगाबादेत भाजपचे कर्जमुक्तिचे बॅनर फाडले 

राजेभाऊ मोगल
गुरुवार, 8 जून 2017

गुरुवारी दुपारी औरंगाबाद मध्ये बीडबायपास रस्त्यावरील लक्षवेधी बॅनर शिवक्रांती युवासेनेने फाडून भाजपच्या बॅनरबाजीचा निषेध केला.

औरंगाबाद : शेतकरी संपाकडे दुर्लक्ष केले, त्यात फुट पाडण्याचा प्रयत्न केला, आता फसव्या कर्जमुक्तिचे बॅनर लावून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळता, असा आरोप करत शिवक्रांती युवासेनेतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष यांचे फोटो असलेले बॅनर फाडून निषेध व्यक्त केला.

कर्जमाफी, शेतमालास हमीभाव यासह विविध मागण्यासाठी १ जूनपासून शेतकऱ्य़ांनी संपाचे हत्यार उपसले. त्यास जिल्हा, तालुका, गावागावातुन प्रतिसाद मिळायला सुरवात होताच सरकारने काही शेतकऱ्यांना हाताशी धरून फुट पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही खेळी त्यांच्याच अंगलट आली. शेतकऱ्यांचा रोष आणखी वाढला, त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्जमाफ, असा निर्णय झाल्याचे जाहिर केले.

मात्र, शेतकरयांकडून संपूर्ण कर्जमाफीच हवी, अशी मागणी जोर धरत असतानाच भाजपने कर्जमुक्ति केल्याबद्दल अभिनंदन, धन्यवाद अशी मोठमोठी बॅनर लावण्याचा धडाका लावला आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यश दानवे यांच्यासह स्थानिक पदधिकाऱ्यांचे फोटो आहेत. हे बॅनर पाहून शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान, गुरुवारी दुपारी औरंगाबाद मध्ये बीडबायपास रस्त्यावरील लक्षवेधी बॅनर शिवक्रांती युवासेनेने फाडून भाजपच्या बॅनरबाजीचा निषेध केला.