'कॅशलेस'साठी खातेधारक "हेल्पलेस'

'कॅशलेस'साठी खातेधारक "हेल्पलेस'

चेकच्या व्यवहारांत दुपटीने, तर कॅशलेसमध्ये तीस टक्‍के वाढ
औरंगाबाद - हजार, पाचशे रुपयांच्या नोटाबंदीनंतर कॅशलेस व्यवहार वाढविण्यासाठी केंद्राने वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यवहारावर अर्धा ते दहा टक्‍क्‍यांपर्यंत सूट देण्याचे जाहीर केले. मात्र, अद्याप वित्तीय साक्षरताही पुरेशी नसताना कॅशलेस व्यवहार करणार कसे? कॅशलेस व्यवहारासाठी लागणारे प्रशिक्षण देण्याची प्रत्यक्ष जबाबदारी बॅंका आणि सरकारचीच आहे. त्यामुळे बॅंकांनी लोकांना कॅशलेस व्यवहाराचे शिक्षण द्यायला हवे, अशी मागणी सर्वसामान्यांतून होत आहे.

कॅशलेस व्यवहारासाठी बॅंकांकडे प्रामुख्याने डेबिट/क्रेडिट कार्ड, इंटरनेट-मोबाईल बॅंकिंग, एनईएफटी-आरटीजीएस आणि स्वाईप मशीन (पॉइंट ऑफ सेल) हे पर्याय उपलब्ध आहेत. आतापर्यंत या पर्यायांचा वापर गरजेनुसार मर्यादित होत होता. आठ नोव्हेंबरला हजार, पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याने नव्या चलनी नोटांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहाराशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. मात्र, बॅंकांकडून पुरविल्या जाणाऱ्या मूलभूत सुविधांबद्दलही असंख्य नागरिक अनभिज्ञ आहेत. त्यात नव्या कॅशलेसची भर पडली. कॅशलेस व्यवहार हा सुरक्षित पर्याय असला तरीही हे व्यवहार कसे करावेत, याबद्दल पुरेशी माहिती नसल्याने ते कॅशलेस व्यवहार करण्यास असमर्थ ठरताहेत. अर्थात आपल्या ग्राहकांना कॅशलेस व्यवहाराबद्दल प्रशिक्षण देण्याची जबाबदारी बॅंकांचीच आहे. मात्र, नोटाबंदीपासून बॅंका जुन्या नोटा जमा करणे, नव्या नोटा वितरित करणे या दोन कामात अडकलेल्या आहेत. त्यामुळे इच्छा असली तरीही ऐंशी टक्‍क्‍यांच्या आसपास खातेधारकांना कॅशलेस सुविधेचा वापर करता येत नाही. त्याकामी त्यांना कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र अथवा कार्यालयीन सहकाऱ्यांची मदत घ्यावी लागते. मात्र, बॅंकांनीच हे प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्यास कॅशलेस व्यवहार करण्यास खातेधारक स्वावलंबी होतील, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्‍त होत आहे.

'कॅशलेस'मध्ये तीस टक्‍के वाढ
कॅशलेसशिवाय पर्याय शिल्लक नसल्याचे लक्षात येत असल्याने बॅंकांमध्ये नवे खाते आणि खातेधारकांकडून एटीएम कार्डसाठी मोठ्या प्रमाणात मागणी वाढलेली आहे. काही बॅंकांकडून खातेधारकांना ताबडतोब एटीएम कार्ड, इंटरनेट-मोबाईल बॅंकिंग आणि चेकबुक दिले जात आहे, तर काही बॅंका खातेधारकांचे विनंती अर्ज आपल्या मुख्यालयाकडे पाठवितात. त्यामुळे साधारणत: आठ ते पंधरा दिवसांचा कालावधी लागतो. नोटाबंदीनंतर किराणा, डेली नीड्‌स, प्रवासी रिझर्व्हेशन (बस, रेल्वे, विमान), वीजबिल, मोबाईल बिल, टेलिफोन बिल, इंधन, मनोरंजन, हॉटेल, बार अँड रेस्टॉरंट, दूध विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांकडून कॅशलेस व्यवहारासाठी स्वाईप मशीन व मोबाईल बॅंकिंगच्या वापरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्याशिवाय कॉर्पोरेट कंपन्या, व्यापारी आणि उद्योजकांकडून इंटरनेट बॅंकिंग आणि एनईएफटी-आरटीजीएसचा सर्वाधिक वापर होतो. यादरम्यान कॅशलेस व्यवहारात तब्बल तीस टक्‍के वाढ झाल्याचा अंदाज बॅंकिंग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्‍त केला.

चेकची संख्या दुप्पट
औरंगाबाद जिल्ह्यात दिवसाकाठी साधारणत: चाळीस ते 50 हजार व्यवहार चेकद्वारे होत असायचे. नोटाबंदीपासून पंधरा दिवस चेकचे व्यवहार ठप्प होते. मात्र, चेकचे व्यवहार सुरळीत सुरु झाल्यापासून किरकोळ व्यवहारासाठीही चेकचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे दिवसाकाठी बॅंकांना तब्बल ऐंशी हजार ते एक लाख चेक वटवण्याचे काम करावे लागत आहे. गेल्या पंधरा दिवसात राष्ट्रीयीकृत, खासगी, सहकारी आणि पतपेढ्या मिळून 15 लाख चेक वटले असण्याचा अंदाज आहे.

कॅशलेस व्यवहार कसे करावेत, हे सर्वसामान्यांना सांगण्यासाठी प्रशिक्षणाची आवश्‍यकता नक्‍कीच आहे. मात्र, सध्या बॅंक अधिकारी- कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या योजना राबवाव्या लागताहेत. अगोदरच अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना बॅंकिंग उद्योगाला करावा लागतोय. हे अतिरिक्‍त प्रशिक्षण खातेधारकांना द्यावयाचे असल्यास अतिरिक्‍त मनुष्यबळाची आवश्‍कता भासेल. अशावेळी खातेधारकांसाठी कॅशलेस व्यवहार शिकवणारा स्वतंत्र विभाग सुरु होण्याची आवश्‍यकता आहे. त्यानंतरच सर्वसामान्य नागरिक जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार करतील. दुसरीकडे जास्तीत जास्त नागरिक बॅंकिंगकडे वळल्याने बॅंक शाखांचे जाळे जास्तीत जास्त वाढविण्याची आवश्‍यकता आहे. त्याव्यतिरिक्‍त बॅंकांमध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ नियुक्‍त करण्याचीही आवश्‍यकता असल्याचे मत बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर व्यक्‍त केले.

औरंगाबाद शहरातील महिनाभरातील आकडेवारी
(बॅंकिंग तज्ज्ञांच्या अंदाजानुसार)

रिझर्व्ह बॅंकेकडून आलेली रक्‍कम : 334 कोटी
खासगी बॅंकांना मुख्यालयाकडून आलेली रक्‍कम : 125 कोटी
नव्याने उघडण्यात आलेल्या खात्यांची संख्या : 80,000
बॅंकांमध्ये जमा झालेल्या जुन्या नोटांची रक्‍कम : 2500 कोटी
बॅंकांमध्ये चेकद्वारे झालेल्या व्यवहारांची संख्या : 15 लाख
बॅंकांकडून बदलून देण्यात आलेल्या नोटांची रक्‍कम : 600 कोटी
कॅशलेस व्यवहाराचे वाढलेले अंदाजित प्रमाण : 30 टक्‍के

जास्तीत जास्त लोकांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी इंटरनेट-मोबाईल बॅंकिंग आणि डेबिट/क्रेडिट कार्ड कसे वापरावे याबद्दल प्रशिक्षणाची नितांत आवश्‍यकता आहे. वेळेअभावी बॅंक अधिकारी-कर्मचारी खातेधारकांना याबाबत अधिक माहिती देऊ शकत नाहीत. त्यासाठी बॅंकांमध्ये स्वतंत्र विभाग निर्माण करण्याची तरतूद करावी.
- रवी धामणगावकर, सचिव, एसबीएच स्टाफ असोसिएशन, औरंगाबाद.

बॅंकेमधून होणाऱ्या व्यवहारांबद्दल असंख्य लोकांना माहिती नाही. यासंदर्भात माहिती देण्याची यंत्रणा वित्त मंत्रालय, केंद्र सरकार अथवा बॅंकांकडे उपलब्ध नाही. त्यामुळे संपूर्ण कॅशलेस होण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागणार आहेत. हे काम पंधरा दिवस अथवा महिनाभरात होणारे नाही. त्यासाठी सरकार आणि बॅंकांनी खेड्यांपासून मेट्रो शहरांमध्ये कॅशलेस व्यवहारांबद्दल प्रशिक्षण शिबिर घ्यावेत.
- देविदास तुळजापूरकर, जनरल सेक्रेटरी, महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉईज फेडरेशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com