मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांवर सीसीटीव्हीची नजर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

बीड - बीड जिल्ह्यातील गेवराई व शिरुर तालुक्‍यातील निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी रविवारी (ता.12) आढावा घेतला. यावेळी मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व व्हिडीओ पथके नेमून नियंत्रण ठेवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

बीड - बीड जिल्ह्यातील गेवराई व शिरुर तालुक्‍यातील निवडणूक पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी रविवारी (ता.12) आढावा घेतला. यावेळी मतदान केंद्रांसह मतमोजणी केंद्रांच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व व्हिडीओ पथके नेमून नियंत्रण ठेवण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

गेवराई येथील नगर परिषदेच्या इमारतीत रविवारी (ता. 12) झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी राम यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. गेवराई तालुक्‍यात 9 गट तर 18 गण आहेत. यासाठी 252 मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले. अशा केंद्रांच्या ठिकाणी अधिक बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. तालुक्‍यातील सर्व झोनल अधिकाऱ्यांनी प्रत्येक मतदान केंद्राची पाहणी करून त्या ठिकाणी सर्व मूलभूत सुविधा असल्याची खात्री करावी, नसल्यास त्या भौतिक सुविधा पूर्ण करून घ्याव्यात, मतमोजणी केंद्राच्या सुरक्षिततेबाबत विशेष लक्ष द्यावे, आदी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 

मतमोजणी होणार असलेल्या अट्टल महाविद्यालयाच्या इमारतीची त्यांनी पाहणी केली. बैठकीनंतर जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांनी गेवराई तालुक्‍यातील गढी, पाडळसिंगी आणि मादळमोही येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आशिष बिरादार आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार चाफेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

शिरुर तालुक्‍यातही पाहणी 
जिल्हाधिकारी राम आणि पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गेवराईनंतर शिरुर तालुक्‍यातील तिंतरवणी, मातोरी आणि वारणी येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी शिरुर येथील तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो) डॉ. आर. एच. चव्हाण आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार आबासाहेब चौरे यांच्यासह सर्व झोनल अधिकाऱ्यांकडून निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला. शिरुर तालुक्‍यात 4 गट व 8 गण असून यासाठी 121 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आले आहेत. त्यापैकी 36 केंद्र संवेदनशील आहेत. या सर्व ठिकाणी वाढीव बंदोबस्त आणि व्हिडीओ व सीसीटीव्हीची व्यवस्था ठेवून नियंत्रण करण्यात येणार आहे. झोनल अधिकाऱ्यांनी सर्व मतदान केंद्रांना सतत भेटी देऊन या प्रक्रियेविषयीची तत्काळ माहिती द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.