वर्ष उलटूनही मध्यवर्ती ग्रंथालयाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जानेवारी 2017

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी सुविधांपासून वंचित

औरंगाबाद - इमारत नाही म्हणून अडचणी सहन केल्या. मात्र, ग्रंथालयाची इमारत बांधून वर्ष उलटले असतानाही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना नव्या ग्रंथालयाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी सुविधांपासून वंचित

औरंगाबाद - इमारत नाही म्हणून अडचणी सहन केल्या. मात्र, ग्रंथालयाची इमारत बांधून वर्ष उलटले असतानाही वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना नव्या ग्रंथालयाची प्रतीक्षा करावी लागत आहे.

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थी मागे राहू नयेत, यासाठी शाळा, महाविद्यालये अद्ययावत झाली आहेत. मात्र, शासकीय संस्था केवळ ‘चलता है’ची भूमिका घेत मूग गिळून गप्प आहेत. असेच चित्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आहे. मध्यवर्ती ग्रंथालयाची प्रशस्त इमारती जवळपास वर्षभरापासून तयार आहे. या नव्या इमारतीत पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या केवळ घोषणाच ठरल्या आहेत. प्रत्यक्षात इमारत तयार असतानाही विद्यार्थी सुविधांपासून वंचित आहेत. 

सध्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत जागेची कमतरता असल्याने पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना एकत्रच अभ्यासिकेत बसावे लागत आहे. ही जुनाट इमारत असल्यामुळे मोबाईलला कव्हरेज मिळत नाही. एखाद्या विद्यार्थ्याचा मोबाईल लागला नाही तर तो ग्रंथालयात असावा, असा अंदाज बांधला जातो, अशी स्थिती आहे. त्यात नवी इमारत तयार असताना सुविधांपासून वंचित का ठेवता, असा प्रश्‍न आता विद्यार्थी उपस्थित करीत आहेत. दरम्यान, प्रशासन फर्निचरसाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे सांगण्यात येत आहे.  

अशा असतील सुविधा
संपूर्ण ग्रंथालय वातानुकूलित असेल. मोफत वायफायची सुविधा, पदवी व पदव्युत्तर अशा दोन स्वतंत्र अभ्यासिका असतील. एससी व एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १० ते १२ हजार एवढी बुक बॅंक. ऑनलाइन जर्नल, ई-बुक अशा सुविधा उपलब्ध असतील.

Web Title: central library waiting