संस्थाचालक, कोषाध्यक्षांची सत्तर लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

औरंगाबाद - मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून पंधरा शिक्षकांची संच दुरुस्ती मान्यता मिळवून देण्याचे आमिष दाखवून चक्क शिक्षणसंस्था अध्यक्ष आणि कोषाध्यक्षांनाच सत्तर लाखांना गंडवल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २६) फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. 

औरंगाबाद - मंत्रालयात ओळख असल्याचे सांगून पंधरा शिक्षकांची संच दुरुस्ती मान्यता मिळवून देण्याचे आमिष दाखवून चक्क शिक्षणसंस्था अध्यक्ष आणि कोषाध्यक्षांनाच सत्तर लाखांना गंडवल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात शनिवारी (ता. २६) फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. 

रेखा चंद्रकांत रेखे या शास्त्रीनगर, जवाहरनगर येथील शंकरबाबा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या कोषाध्यक्ष आहेत. त्यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार, पुष्पा रामचंद्र जोशी या संस्थेच्या अध्यक्ष असून, संस्थेअंतगत वाळूज परिसरातील बजाजनगर येथे त्रिमूर्ती बालक मंदिर ही शाळा चालविण्यात येते. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत प्रत्येक वर्गाच्या तीन तुकड्या आहेत. शाळेत एकूण २३ शिक्षक असून, त्यापैकी १५ शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता नाहीत.

शाळेची लिपिक, सेवक पदे आणि अनुदान दुरुस्तीच्या प्रलंबित कामासाठी त्यांनी जिल्हा परिषदेत प्रस्ताव दाखल केला; पण त्यांना पाठपुरावा करणे शक्‍य नव्हते. त्यामुळे शाळेचे सेवक सुनील गोपाल चौधरी यांनी काम करून देण्यासाठी रेखे यांची संशयित रामेश्‍वर कानघुले (रा. नेहरूनगर, शिवाजीनगर) याच्याशी ओळख करून दिली. त्याने आपली मंत्रालयात मोठी ओळख असल्याचे सांगत शिक्षक संच मान्यता मिळवून देतो, एका शिक्षकासाठी चार ते पाच लाख असे पंधरा शिक्षकांसाठी ७५ ते ऐंशी लाख रुपये द्यावे लागतील. पैसे दिल्यासच जिल्हा परिषदेतून शिक्षक मान्यतेची कामे करून देतो, असे आमिष दाखवले. यानंतर शिपाई चौधरी यांनीही कानघुले सज्जन व्यक्ती असून, ते कामे करतील असा विश्‍वास रेखे यांना दिला. त्यामुळे सर्व शिक्षकांचे काम होईल, या आशेने त्यांनी पैसे देण्याचे मान्य केले. 

मान्यताही नाही अन्‌ पैसेही नाहीत
संशयित कानघुले याने टाळाटाळ करून मान्यता तर मिळवून दिलीच नाही. संस्थेकडून घेतलेले पैसेही दिले नाही. फसवणूक झाल्याने कोषाध्यक्ष रेखे यांनी तक्रार दिली. यात आर्थिक गुन्हे शाखेने तपास केला. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. आर्थिक गुन्हेशाखेच्या पथकाने संशयिताला शनिवारी अटक केली.

शिक्षकांनी जमवली रक्कम 
अध्यक्ष, सेवक चौधरी व श्रीमती रेखे हे तिघे कानघुले याच्या घरी गेले. त्यावेळी दोन-तीन महिन्यांत ३४ लाख रुपये द्यावेत, उर्वरित रक्कम नंतर द्यावी, अशी ऑफर त्याने दिली. त्यानंतर शिक्षकांची एकत्रित जमा झालेली तीस लाखांची रक्कम १९ सप्टेबर २०१५ ला सेवक चौधरींच्या हस्ते कानघुले यांना दिली. यानंतर वेळोवेळी एकूण सत्तर लाखांची रक्कम दिली.

Web Title: cheating crime police